PimpriPune : उपचार नाकारणाऱ्या निरामय हाॅस्पिटलवर कारवाई करा – इरफान सय्यद

Take action against Niramay Hospital for refusing treatment - Irfan Syyed : कोविड रुग्णांसाठी शहरातील रुग्णालये अधिग्रहित करा; जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांकडे मागणी

एमपीसीन्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील रुग्ण संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका रुग्णालयातील बेड कमी पडत आहेत. त्यातच पावसाळ्यात देखील रुग्ण वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी पिंपरी पालिका हद्दीतील सर्व मोठी खासगी रूग्णालये आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तत्काळ अधिग्रहित करावीत, अशी मागणी शिवसेना सहसंपर्कप्रमुख, कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे.

जेणेकरून रुग्णांचे बेड मिळत नसल्याने हाल होणार नाहीत. त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार नाही. चिंचवड येथील निरामय हाॅस्पिटल या खाजगी रूग्णालयात नागरिकांना प्राथमिक उपचार नाकारले जात आहेत. या हाॅस्पिटलवर आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार त्वरीत कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात इरफान सय्यद यांनी म्हटले आहे की, देशात व राज्यात कोरोना व्हायरस या आजाराचे मोठ्याप्रमाणात रूग्ण सापडत आहे.

या विषाणुचा पादुर्भाव वाढत आहे. गेल्या तीन महिन्यापासून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर रूग्ण आहेत. पिंपरीतील रूग्णांची संख्या साडे आठ हजाराच्या उंबरठ्यावर आहे. आता पावसाला सुरुवात झाली आहे.

पावसाळी वातावरणामुळे थंडी, ताप, खोकला यासारख्या आजाराचे रूग्ण जास्त सापडत असतांना या रूग्णांना प्राथमिक उपचार देण्यासाठी खाजगी हाॅस्पिटल नकार देत आहे.

एखादा रुग्ण रात्री रूग्णालयात गेल्यावर त्याला गेटच्या बाहेर थांबवून थंडी, ताप, खोकला आहे का ? असे विचारण्यात येते. ताप असेल तर त्याला यशंवतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात जाण्याचे सांगितले जाते.

सकाळी फिवर ओपडीच्या नावावर पेशंटला न तपासताच यशंवतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात पाठवण्यात येते. अशा पद्धतीने चिंचवड येथील निरामय हाॅस्पिटल या खासगी रूग्णालयात रूग्णाला उपचार देण्याचे टाळण्यात येत आहे.

आज सकाळी चिखली येथील एक गृहस्थ अस्वस्थ वाटत असल्याने निरामय हॉस्पिटलमध्ये येथे गेला असता त्यांना तेथे प्राथमिक उपचार करण्यास नकार देण्यात आला.

अशा प्रकारचे अनुभव अनेक रुग्णांना आले आहेत. पण या खासगी हाॅस्पिटलचे लागेबांधे शासकीय अधिकारी वर्गासोबत जास्त असल्याने त्यावर कारवाई करण्यात येत नाही.

त्यामुळे इतर दिवसात रूग्णांना सेवा देण्याच्या नावाने पैसे कमविणा-या या रूग्णालयला सध्याच्या आत्पकालिन परिस्थितीत रूग्णाला सेवा देण्याच्या कर्तव्याचा विसर पडला आहे का ? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

कोरोना महामारीत बेजबाबदारपणे वागणाऱ्या या खासगी हाॅस्पिटलवर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.

महापालिका कोरोनाची परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी अनके उपाययोजना केल्या आहेत.

पालिका हद्दीतील रुग्णसंख्या साडे आठ हजाराच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या प्रमाणावर रुग्णांची तपासणी चालू आहे. यातील बहुतांश रुग्णांना उपचारासाठी महापालिका दाखल करण्यात येत आहे.

पण काही दिवसांपासून शहरातील शासकीय रूग्णालयात जागा नसल्याने दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांनी खासगी हाॅस्पिटलला जाणे पसंत केले. पण कोरोनासाठी राखीव असलेल्या हाॅस्पिटलमध्ये रूग्णाला उपचारासाठी जागाच उपलब्ध नाही.

तसेच अनेक खाजगी हाॅस्पिटल रिकामी असून सुद्धा फक्त कोरोना विषाणूचे संशंयित रुग्ण म्हणून या रूग्णांना प्राथमिक उपचार करणे तसेच दाखल करून घेण्यासाठी नकार देणे, असा मनमानी कारभार करत शासकीय आदेश धाब्यावर बसवण्याचे काम काही खाजगी हाॅस्पिटल करत आहे.

त्यामुळे अशा हाॅस्पिटलवर कारवाईसाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.

देशातील अनेक राज्यात व महाराष्ट्रातील अनेक भागातही खाजगी रूग्णालय उपचारासाठी अधिग्रहण करून त्यात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरात नामांकित अशी 10 रुग्णालये आहेत. ज्यांची खाटाची संख्या 100 च्या आसपास असून अतिदक्षता विभागात 10 खाटा व व्हेंटिलेटर ( कृत्रीम श्वास उपकरण ) व विविध साधनसामग्री उपलब्ध आहेत.

शहरातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि रूग्णाला योग्य उपचार मिळावे याकरिता “आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत ” शहरातील सर्व खासगी हाॅस्पिटल कोरोनाची परिस्थिती सुरळित होत नाही तोपर्यंत अधिग्रहित करावीत, अशी मागणी इरफान सय्यद यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.