Pimpri: सांडपाणी, घन कच-याबाबत गंभीर नसलेल्या अधिका-यांवर कारवाई करा -गजानन बाबर

एमपीसी न्यूज – सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येकवर्षी भांडवली खर्चापैंकी 25 टक्के तरतूद राखीव ठेवणे, त्याच कामासाठी खर्च करण्याचे ‘एमपीसीबी’, नगरविकास विभागाचे निर्देश असताना पिंपरी महापालिकेने मागील तीन वर्षांपासून त्याचे उल्लंघन केले आहे. तरतूद केलेल्या पैशांचा इतर कामासाठी वापर केला आहे. या नियमाचे उल्लंघन केलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात बाबर यांनी म्हटले आहे की, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी तरतूद केलेली रक्कम इतर कोणत्याही विकास कामासाठी वापरण्यात येऊ नये असे निर्देश आहेत.

नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे यांच्या पत्रानुसार सांडपाणी व नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठीची रक्कम इतर कामासाठी खर्च करु नये असे स्पष्टपणे नमूद केले आहे. परंतु, महापालिकेने मागील तीन वर्षात 25 टक्के तरतुदीप्रमाणे 647.40 कोटी तरतूद केली. त्यापैकी फक्त 323.68 कोटी रुपये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर केला आहे. ही रक्कम अतिशय कमी आहे.

महापालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करीत आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत महापालिका गंभीर नाही. यावरुन महापालिकेची पर्यावरणा बद्दलची उदासीनता दिसून येत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि नगरविकास विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस यांनी मागील तीन वर्षात तरतुदीप्रमाणे खर्च न केल्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

मागील तीन वर्षाचा खुलासा करुन नियमाचे पालन न केल्याबाबत संबंधित अधिका-यांवर कारवाई करावी. महापालिकेने 2020-21 या आर्थिक वर्षात नगरसचिव विभागाच्या आदेशाचे पालन करावे, अशी मागणी बाबर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.