Pimpri: रुग्णांवर उपचारास नकार देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा- नामदेव ढाके

Take action against private hospitals that refuse treatment to patients - Namdev Dhake

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासकीय व महापालिकेच्या रुग्णालयासोबतच काही खासगी रुग्णालये देखील चांगली कामगीरी बजावत आहे. तसेच या आजाराची लक्षणे लक्षात घेवुन जबाबदारीचे भान राखत त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्याचे काम सुरु आहे. परंतु, शहरातील काही खासगी रुग्णालये स्टाफ व बेड शिल्लक नाही, डॉक्टर उपलब्ध नाही अशी कारणे सांगून कोरोना रुग्णांना उपचारास नकार देत असल्याच्या काही घटना निदर्शनास आल्या आहेत. अशा रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करावी. वेळप्रसंगी त्यांचे परवाने रद्द करावेत, अशा सूचना सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पालिका आयुक्तांना केल्या आहेत.

याबाबत ढाके म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरु असताना खासगी रुग्णालयांनी शासकीय व पालिका रुग्णालयाप्रमाणे आपले कर्तव्य लक्षात घेत रुग्णसेवा देणे बंधनकारक आहे. मात्र, कोरोना संशयीत रुग्णांवर खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारणे हा प्रकार योग्य नाही.

वास्तविक पाहता कोरोना संशयीत रुग्णांचे मनोधैर्य वाढविणे हे देखील खासगी रुग्णालयाचे कर्तव्य आहे. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” आहे. मात्र, कोरोनाकाळात काही खासगी रुग्णालयांना या ब्रिदवाक्याचा विसर पडला आहे.

शासनाकडून कोविड-१९ रुग्णांसाठी खासगी रुग्णालयातील ८०% बेड आरक्षित करण्याचे आदेश यापुर्वीच दिलेले आहेत. त्यासंदर्भात महापालिकेकडून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापन प्रतिनिधींची बैठक बोलावून बेड नियोजन संदर्भात तशा सुचना केल्या आहेत.

परंतु, काही खासगी रुग्णालये या सुचनांचे पालन न करता काहीतरी कारणे देत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन कोरोना वगळता इतर आजाराचे रुग्ण उपचारासाठी भरती करुन घेत आर्थिक हित जोपासत आहेत. तसेच त्यांच्याकडून रोख स्वरुपाची बीले वसुल करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

शासनाने घालून दिलेल्या आदेशांची सर्रासपणे पायमल्ली अशा प्रकारातून काही खासगी रुग्णालयांकडून होत असताना आढळून येते. अशा रुग्णालयांनी कोरोना महामारीच्या काळात आपले आर्थिक हित दूर ठेवून शासनाला व महापालिकेला सहकार्य करणे अपेक्षित आहे.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शहरातील खासगी दवाखाने व रुग्णालये यांच्या ओपीडी सुरु असणे अत्यावश्यक आहे.

माणूसकीच्या नात्याने ओपीडीच्या माध्यमातून तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, अशा नियमांना फाटा देण्याचे काम काही ठिकाणी सुरु आहे. कोरोना काळात सर्वांनी मिळून या महामारीला रोखण्याची गरज असून त्याची मोठी जबाबदारी ही रुग्णालयांवर आहे.

मात्र, वरीलप्रमाणे काही घटना समोर येत असल्याने अशा रुग्णालयांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

जे खासगी दवाखाने व रुग्णालये नागरिकांना कोणत्याही कारणास्तव उपचार करण्यास नकार अथवा त्यांच्यावर उपचारास टाळाटाळ केल्याची बाब निदर्शनास आल्यास अशा खासगी दवाखाने व रुग्णालयावर हॉस्पिटल आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, वेळप्रसंगी त्यांचे परवाने रद्द करावेत, अशा सुचना सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.