Pimpri: शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करा- ‘राष्ट्रवादी युवक’ची मागणी

Take action against schools demanding tuition fees - Demand of NCP youth

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि उपजीविकेची साधने अडीच महिने बंद होती. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी व विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्याचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षात पालकांना शालेय शुल्क जमा करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.

कोविड-19 या कोरोना विषाणूमुळे देशात व राज्यात लॉकडाऊन जाहीर केले होते. लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात उद्योग, व्यवसाय, नोकरी बंद आहे. परिणामी, बंदमुळे संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि उपजीविकेची साधने बंद आहेत.

अशा परिस्थितीत शहरातील खासगी व विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी भरण्याचा तगादा लावला जात आहे.

लॉक डाऊननंतर मागील पंधरा वीस दिवसापासून बाजारपेठा व उद्योग हळूहळू सुरू झाले आहेत. नागरिकांना पगार अथवा आर्थिक येणे देणे मिळणे कठीण जात असताना त्यांना पाल्यांचे शालेय शुल्क भरणे जास्तच कठीण जाणार आहे.

राज्य सरकारने 8 मे 2020 रोजी राज्यभरातील शालेय शुल्क वाढ आणि जमा करण्याची सक्ती न करण्याचा शासन निर्णय काढला आहे.

सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये.

संपूर्ण लॉकडाऊन परिस्थिती संपल्यानंतर शालेय फी जमा करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.

तरीही, पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील शाळा राज्य सरकारच्या निर्णयाचे पालन करत नाहीत. पालकांना खासगी व विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे.

शहरातील अनेक शिक्षण संस्थाकडून एसएमएस, फोन, ई-मेल, व्हाट्सअपद्वारे फी भरण्याबाबत विचारले जात आहे.

यामुळे शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर तात्काळ कठोर व कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

अन्यथा मनमानी शिक्षण संस्था व्यवस्थापनांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.