Pimpri: मारहाण प्रकरणी शिवसेना, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर कारवाई करा- भाजपची मागणी

Take action against Shiv Sena and NCP corporators in assault case- BJP's demand

भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट; तक्रार न देताच कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना झालेल्या मारहाणीचा भाजपने निषेध केला आहे. मारहाणप्रकरणी आज मंगळवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेत शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्यावर कारवाईची मागणी केली. दरम्यान, मडिगेरी यांनी अद्याप पोलिसांत कोणत्याही प्रकारची तक्रार दिली नाही. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नक्की मारहाण का झाली, वैयक्तिक कारणाने झाली की राजकीय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे आणि विलास मडिगेरी यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. मडिगेरी यांनी राहुल कलाटे, आणि मयूर कलाटे यांनी माहराण केल्याचा आरोप केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

तर, राहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांनी मडिगेरी यांच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मारहाणीच्या प्रकरणाबाबत महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत मारहाण प्रकरणी संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली.

राज्यात सत्तेत आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी वाढली आहे. सोमवारी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना मारहाण केली आहे. त्यामुळे या नगरसेवकांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपने पोलीस आयुक्तांना दिले.

मारहाण झालीच नाही, मडिगेरी यांची निव्वळ स्टंटबाजी – राहुल कलाटे

याबाबत बोलताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, मारहाण झाली नाही. बाचाबाची झाली आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीत कमी पडलेल्या मतांच्या धक्क्यातून आमदार लक्ष्मण जगताप अद्यापही सावरले नाहीत. मडिगेरी यांना पुढे करून ते आमची नाहक बदनामी करत आहेत. त्यांचे ऐकून मडिगेरी स्टंटबाजी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.