Pimpri : नगरसेवक जावेद शेख यांच्यापासून जीवितास धोका, कारवाई करा; शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांची मागणी

एमपीसी न्यूज – नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळे शेख यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांनी पोलिसांकडे केली आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक प्रमोद कुटे यांनी म्हटले आहे की, प्रभागातील साई मंदिर परिसरातील रहिवाशी नागरिकांना गेल्या दोन वर्षांपासून त्रास देण्या-या काही गुंड मुलांना महिलांनी रविवारी (दि.6) चोप दिला. निगडी पोलीस ठाण्यात त्याची तक्रार दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी गुन्हा नोंदविला. लोकप्रतिनिधी म्हणून मी नागरिकांसमवेत तिथे थांबलो होतो. तक्रार नोंदविण्यास सांगितली. महिलांना शिवीगाळ, धिंगाणा घालून दहशत पसराविणारी मुले गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे नगरसवेक जावेद शेख यांनी सांभाळलेली आहेत, असे कुटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

माझ्या पोरांवर गुन्हा का नोंदवला, माझ्या मुलांविरोधात तक्रार का केली, या गोष्टींचा राग धरुन नगरसेवक शेख याने माझ्या मित्रास फोन करुन ‘उसको समजा के रखो, नही तो काट डालुंगा’ अशी धमकी दिली आहे. मध्यरात्री सव्वा एक वाजता आणि पुन्हा सकाळी 11 वाजता धमकी दिली आहे. शेख हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत. त्यांच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, किडनॅपिंग, अवैध धंदे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे कुटे यांनी म्हटले आहे.

त्यांच्याकडून आपल्या जीवितास धोका आहे. या गंभीर विषयात तातडीने लक्ष घालून शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक कुटे यांनी निवेदनातून केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.