Pimpri: शहरातील शैक्षणिक संकुलातील हॉस्टेल, निवासी हॉटेल ताब्यात घ्या- मंगला कदम

Pimpri: Take possession of hostels, residential hotels in the city says mangala kadam शहरात ब-याच खासगी विकसकांनी गृह निर्माण सुंकले तयार केली आहेत. परंतु ती अद्याप तशीच आहेत. ती संकुलेसुध्दा पालिकेला रास्त दरात भाड्याने घेऊन तिथे कोरोनाबाधित रुग्णांची सोय करता येईल.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांसाठी खासगी शैक्षणिक संकुलातील वसतिगृह, निवासी हॉटेल, लॉज ताब्यात घ्यावेत. तिथे बाधित रुग्णांची व्यवस्था करावी अशी सूचना माजी महापौर तथा राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी आयुक्तांना केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेविका कदम यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

शहरात आजअखेर 3329 कोरोना बाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. रोज चारशे-पाचशेच्या पटीत कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे.

जुलै – ऑगस्टमध्येसुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 20 ते 25 हजार होईल असा वैद्यकीय विभागाचा अंदाज आहे.

शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांची कोरोना बाधित रुग्ण ठेवण्याची क्षमता आत्ताच संपलेली आहे. त्यामुळे येथून पुढे कोरोनाबाधित रुग्णांसाठी शहरात खासगी अथवा सरकारी रुग्णालयांमध्ये बेड मिळणार नाही. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांमध्ये घबराट होऊन मानसिकदृष्टया त्यांचे खच्चीकरण होत आहे.

त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. त्यासाठी शहरातील मोठी हॉटेल्स, लॉज खासगी शैक्षणिक संस्थाची वसतिगृहे, पालिकेच्या मिळकती आदी मिळकती तातडीने ताब्यात घ्याव्यात. तिथे मुलभूत सुविधा उपलब्ध करुन त्याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना ठेवता येईल.

त्याचप्रमाणे शहरात ब-याच खासगी विकसकांनी गृह निर्माण सुंकले तयार केली आहेत. परंतु ती अद्याप तशीच आहेत. ती संकुलेसुध्दा पालिकेला रास्त दरात भाड्याने घेऊन तिथे कोरोनाबाधित रुग्णांची सोय करता येईल.

अशा विविध प्रकारचे उपाय कोरोना बाधितांसाठी आता पासूनच करणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन पावसाळ्यामध्ये या रुग्णांना ठेवणे अवघड होईल. त्यामुळे आता पासूनच कृतीशील आराखडा तयार करुन या रुग्णांसाठी तयारी करावी लागेल.

तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी पालिकेमार्फत कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी. कोरोना झाल्यास न घाबरता कसे उपचार घेता येतील. याबाबत नागरीकांचे समुदेशन करणे आवश्यक आहे.

मानसिकदृष्टया नागरिकांना सक्षम बनविणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेच्या सारथी हेल्पलाईनवरुन समुपदेशन करता आल्यास नागरीक कोरोनास न घाबरता योग्य ती काळजी घेतील, असेही कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.