Pimpri: ‘पदाधिका-यांनी परदेश दौ-यावर करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी’

समाजवादी पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिका-यांनी अभ्यासाच्या नावाखाली परदेशात जाऊन करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करु नये. दौ-याची फलनिष्पती शून्य होत आहे. त्यामुळे पालिकेच्या खर्चातून होणारे अभ्यास दौरे रद्द करावेत, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देश-परदेश अभ्यास दौरे वाढले आहेत. केवळ सहल व पर्यटनासाठी हे दौरे आयोजित केले जातात. त्याचा प्रत्यक्ष शहराच्या विकासात काहीच लाभ होत नाही. महापालिकेचे मुख्य आर्थिक स्त्रोत असलेले जकात व एलबीटी बंद झाल्याने पालिकेचे आर्थिक स्त्रोत कमी झाले आहेत. त्यामुळे सत्ताधा-यांनी महापालिकेत काटकसर करून बचतीचे नवे धोरण अंवलबल्याचा नाटक केले. फुटकळ खर्चाना फाटा देत शाबासकी मिळविली. बचतीचे धोरण असूनही, दुसरीकडे दौ-यावर वारेवाप उधळपट्टी केली जात आहे.

स्मार्ट सिटी, महापौर परिषद, मेट्रो सिटीची पाहणी, बीआरटीएस सेवेची पाहणी, शाळांचा दर्जा, महिलांसाठी लघुउद्योग, स्टेडियम, स्वच्छ भारत अभियान, परिषद, प्रदर्शन असा विविध कारणांसाठी दौरे आयोजित केले गेले. या दौर्‍यावर नागरिकांच्या कररूपी पैश्यातील उधळपट्टी करण्यात येत आहे. तसेच, एकाही अभ्यासदौराचा अहवाल सर्वसाधारण सभेपुढे सादर केला गेलेला नाही. त्यामुळे हे दौरे रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.