Pimpri : वीज दरवाढ विरोधात सर्व ग्राहकांनी मंगळवारी आंदोलनात सहभागी व्हावे – संदीप बेलसरे

एमपीसी न्यूज – राज्यातील औद्योगिक वीज दर नोव्हेंबर 2016 च्या आदेशानुसार मार्च 2020 पर्यंत कायम ठेवण्यात यावेत. 30 सप्टेंबर 2018 पासून केलेली औद्योगिक आणि सर्व ग्राहकांची वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी. तसेच राज्य सरकारने सप्टेंबर 2018 ते मार्च 2020 पर्यंतच्या वीज दर फरकापोटी 3400 कोटी रुपये अनुदान महावितरण कंपनीस द्यावे. या मागणीसाठी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. 12 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता निगडीतील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करुन वीज बिलांची होळी आणि ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी शनिवारी पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सचिव जयंत कड, संचालक नवनात वायाळ, विजय खळदकर, संजय सातव, शिवाजी साखरे, स्वीकृत संचालक प्रमोद राणे, भारत नरवडे, बशीर तरसगार आदी उपस्थित होते.

  • यावेळी बेलसरे यांनी सांगितले की, वीज दरवाढ विरोधात राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे. या मोर्चांमध्ये वीज वापर करणाऱ्या सर्व ग्राहकांनी म्हणजे सर्व सुक्ष्म, लघु, मध्यम, मोठे उद्योजक, व्यापारी, घरगुती व वाणिज्य, व्यावसायिक वीज वापर करणारे ग्राहक, शेतकरी यांनी आपापल्या उद्योगातील कामगारांसह या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सचिव जयंत कड यांनी केले.

पाच वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे आंदोलन वीज ग्राहकांनी राज्यभर केले होते. त्यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे नाशिक येथील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे सरकार आल्यास आम्ही कोणत्याही प्रकारची वीज दरवाढ करणार नाही असे आश्वासन दिले होते.

  • लघु उद्योग संघटना आणि ग्राहकांच्या तीव्र विरोधामुळे त्यावेळीच्या आघाडी सरकारने 6 हजार कोटी रुपयांचे अनुदान महावितरणला दिले होते. त्यामुळे तेंव्हाची वीज दरवाढ रद्द करुन राज्यातील सर्व ग्राहकांना दिलासा दिला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर फरकापोटी 3400 कोटी रुपये अनुदान महावितरण देऊन महाराष्ट्रातील जनतेची होणा-या महागाईपासून सुटका करावी. अन्यथा फेब्रुवारी अखेरपर्यत वीज दरवाढ रद्द केली नाहीतर, राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.