Pimpri: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सचा पुणे प्रकल्प 25 ते 31 मार्च दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन टाटा मोटर्स कंपनीच्या व्यवस्थापनाने पुणे प्रकल्पातील काम झपाट्याने कमी करण्याचा निर्णय घेतला असून हा प्रकल्प बंद करण्याची प्रक्रिया मंगळवारी ( 24 मार्च) मध्यरात्रीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन हा प्रकल्प 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गुंटर बुटशेक यांनी एका पत्रकाद्वारे या बाबतची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपनीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 19 मार्चपासून कंपनीत विभागवार कामगारांचे दोन गट दिवसाआड काम सुरू ठेवून कारखान्यात एका वेळी कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कंपनीने पुणे प्रकल्प काही दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

पुणे प्रकल्प बंद करण्याची प्रक्रिया सोमवारी (23 मार्च) मध्यरात्री सुरू करून मंगळवारी (24 मार्च) मध्यरात्रीपर्यंत प्रकल्प पूर्ण बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी शासन तसेच स्थानिक प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची भूमिका कंपनी व्यवस्थापनाने घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार 22 मार्चला सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान होणाऱ्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहीत केले आहे.

कसे खेळायचे आणि कसे कमवायचे ते शिका Lucky Jet वास्तविक पैशासाठी सर्वोत्तम 1Win कॅसिनो बोनससह

या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेला पाठिंबा व केलेल्या सहकार्याबद्दल बुटशेक यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत. कोरोना प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून स्वतःची व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शुक्रवारी) उद्योग प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना 31 मार्चपर्यंत उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला कंपन्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सर्वात मोठ्या टाटा मोटर्स कंपनीने उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अन्य उद्योगांना देखील त्यांचे उत्पादन बंद ठेवणे शक्य होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.