Pimpri : टाटा मोटर्सतर्फे पुण्‍यातील 500 वंचित विद्यार्थ्‍यांना शिष्यवृत्तीचे वितरण

एमपीसी न्यूज – वंचित विद्यार्थ्‍यांना दर्जेदार उच्‍च शिक्षण घेण्‍यासाठी प्रोत्‍साहन देण्यासाठी टाटा मोटर्स पुण्‍यातील 500 विद्यार्थ्‍यांसाठी तीन-वर्षांसाठी शिष्यवृत्ती देत आहे. टाटा मोटर्सच्या ‘विद्याधनम’ या उपक्रमांतर्गत ही शिष्यवृत्ती इयत्ता सातवी ते दहावी पर्यंतच्‍या हुशार व आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल विद्यार्थ्‍यांना देण्यात येत आहे. प्रत्‍येकी चार हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

समता शिक्षण संस्‍था, सेवा सहयोग फाऊंडेशन, सुप्रभात महिला मंडळ आणि स्‍वरूपवर्धिनी या विविध स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या सहयोगाने हा उपक्रम राबवण्‍यात आला. यावर्षी एकूण 500 विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. सखोल गुणवत्ता चाचणीच्‍या आधारे या प्रत्‍येक उमेदवाराची निवड करण्‍यात आली आहे.

टाटा मोटर्सच्‍या सीएसआरचे प्रमुख विनोद कुलकर्णी म्‍हणाले, “संस्‍थांचा पाठिंबा व संसाधनांच्‍या अभावामुळे जवळपास 50 टक्‍के विद्यार्थ्‍यांची माध्‍यमिक शिक्षण पातळीवर गळती होते. टाटा मोटर्समध्‍ये आम्‍ही संसाधने आणि अनुसूचित जाती-जमातीमधील मुलांच्‍या उपस्थितीचा अभाव असलेल्‍या शाळेच्‍या माध्‍यमिक टप्‍प्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.टाटा मोटर्सने नेहमीच शैक्षणिक विकासासोबत शारीरिक व सामाजिक विकासासंदर्भात, तसेच मूल्‍ये रूजवण्‍यासंदर्भात योग्‍य शिक्षण मिळण्‍यासाठी ‘सर्वांगीण सहभागाला’ प्रोत्‍साहित केले आहे.

‘विद्याधनम’ या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्‍यमातून टाटा मोटर्स विशेष प्रशिक्षण वर्गांच्‍या लक्ष्‍य दृष्टिकोनाच्‍या मदतीने माध्‍यमिक शाळा-महाविद्यालयांमध्‍ये जाणा-या विद्यार्थ्‍यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. 2018-19 या आर्थिक वर्षात टाटा मोटर्सने 1.4 लाखांहून अधिक विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. या शिष्यवृत्ती उपक्रमासह आम्‍ही या विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनावर सकारात्‍मक प्रभाव पाडण्‍याची व त्‍यांना उज्‍ज्‍वल भविष्‍याच्‍या दिशेने घेऊन जाण्‍याची आशा करतो.”

दुर्बल आर्थिक स्थितीमुळे तसेच घर ते शाळा यामध्ये असलेल्या भल्या मोठ्या अंतरामुळे शाळा सोडावी लागल्‍यानंतर शिक्षण पूर्ण करण्‍यामध्‍ये असमर्थ ठरलेल्‍या विद्यार्थ्‍यांना मदत करण्‍याच्‍या उद्देशाने टाटा मोटर्सने दहा वर्षांपूर्वी विद्याधनम हा प्रमुख शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. अशा उपक्रमांमुळे सरकारी शाळांमधील उत्तीर्ण होण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये मोठी सुधारणा झाली आहे. 2015 मधील 55 टक्‍यांवरुन गेल्‍या शैक्षणिक वर्षामध्‍ये 80 टक्‍क्‍यांपर्यंत उत्तीर्ण होण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये वाढ झाली आहे. विद्यार्थ्‍यांचे सरासरी गुण 5 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. 44 टक्‍के विद्यार्थ्‍यांनी त्‍यांच्‍या इयत्‍ता दहावीच्‍या बोर्ड परीक्षेमध्‍ये 60 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.