Pimpri: 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांची करमाफी, महापालिकेचे वर्षाला 37 कोटींचे नुकसान; आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठविला प्रस्ताव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आणि यापुढे नव्याने आकारणी होणा-या 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 1 एप्रिल 2020 पासून मालमत्ता कर माफ करण्याचा घेतलेला निर्णय आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आहे. यामुळे महापालिकेचे वर्षाला तब्बल 37 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे, असा अभिप्राय देत प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या आर्थिक हिताविरोधातील प्रस्ताव असल्याने सरकार हा प्रस्ताव विखंडीत करण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील सत्ता गेल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने डिसेंबर महिन्याच्या 10 जानेवारी रोजी झालेल्या तहकूब सभेत शहरातील 2000 हजार चौरस फुटापुढील अवैध बांधकामांचा 100 टक्के शास्तीकर माफ करण्यात यावा. तसेच महापालिका हद्दीतील आणि यापुढे नव्याने आकारणी होणा-या 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 1 एप्रिल 2020 पासून मालमत्ता कर माफ करण्याची उपसूचना मंजूर केली होती.

त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील आठवड्यात आपल्या अभिप्रायासह दोन्ही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले आहेत. 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांच्या करमाफीमुळे महापालिकेचे वर्षाला तब्बल 37 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. नुकसान कसे भरुन काढता येईल, त्याच्या माहितीसह प्रस्ताव पाठविला आहे. प्रस्ताव विखंडीत करायचा की मान्य करायचा याचा निर्णय सरकार घेईल.

तसेच शहरातील 2000 हजार चौरस फुटापुढील अवैध बांधकामांचा 100 टक्के शास्तीकर माफ करण्याचा प्रस्ताव देखील पाठविला आहे. यापुर्वी राज्य सरकारने 1000 हजार स्व्केअर फुटापर्यंतच्या अवैध मालमत्तांचा शास्तीकर माफ केला आहे. त्यामुळे किती नुकसान झाले आहे, याची संपुर्ण सविस्तर माहिती प्रस्तावासह राज्य सरकारकडे पाठविली असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.