Pimpri: ‘महायुती’च्या सरकारला धडा शिकवा – गिरीजा कुदळे

एमपीसी न्यूज – राज्यातील महायुती सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी केले.

उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ पिंपरीतील प्रभाग क्र. 21 पिंपरीगाव व कॅम्प परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कुदळे बोलत होत्या. या पदयात्रेत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक डब्बू आसवाणी, नगरसेविका उषा वाघेरे, निकीता कदम, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, जगन्नाथ साबळे, माजी नगरसेविका शांती सेन, रेश्मा कांबळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी गिरीजा कुदळे म्हणाल्या की, राज्यातील शिवसेना, भाजप महायुती सरकारचा कारभार पाहिला असता. सरकारला सर्व पातळ्यांवर अपयश आले आहे. पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन भाजप, शिवसेना महायुतीने दिले होते. मात्र, आज शहराची अवस्था अतिशय बकाल झाली आहे. शहरात आयुक्तालय झाल्याचा कोणताही सकारात्मक परिणाम दिसत नाही. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या आमदाराने कोणतेही प्रभावी काम मतदारसंघात केलेले नाही.

पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा मागील निवडणुकीत विजय अतिशय थोडक्यात हुकला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी अविरत परिश्रम घ्यावेत, असे आवाहन स्थायी समितीच्या माजी सभापती उषा वाघेरे यांनी केले.

माजी उपमहापौर डब्बू आसवानी म्हणाले की, पिंपरी मतदारसंघाला काम करणारा माणूस हवा आहे. मतदारसंघातील अन्य उमेदवारांच्या मानाने अण्णा बनसोडे यांची काम करण्याची क्षमता कितीतरी पटीने अधिक आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आसवानी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.