Pimpri: शिक्षकांनो, शाळांचा दर्जा सुधारा; अन्यथा घरचा रस्ता दाखवू – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांची गुणवत्ता वाढ, दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या शाळेतील सुविधा खासगी शाळांपेक्षा उत्तम आहेत. खासगीच्या तुलनेत शिक्षकांना चांगला पगार दिला जातो. खासगी शाळेमध्ये जसे शिक्षक मुलांसाठी कष्ट घेतात तसे कष्ट आपले शिक्षक का घेत नाही? असा सवाल सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मुख्याध्यापकांना केला. चांगला काम करा, अन्यथा घरचा रस्ता दाखविला जाईल, असा इशाराही त्यांनी शिक्षकांना दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्राथमिक आणि माध्यमिकच्या सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. चिंचवडच्या अ‍ॅटो क्लस्टरच्या सभागृहात आज (सोमवारी) झालेल्या या कार्यक्रमात शिष्यवृत्तीमधील गुणवंत विद्यार्थी आणि उपक्रमशील शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते.

  • यावेळी महापौर राहुल जाधव, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर, शिक्षणाधिकारी पराग मुंढे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात शिष्यवृत्ती मिळवलेल्या 10 विद्यार्थ्यांसह 15 उपक्रमशील शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ”महापालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षक मार्गदर्शन शिबिर, शाळा पाहणी दौरा अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या समजावून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या पटवाढीसाठी देखील विशेष प्रयत्न केले”.

  • तुम्ही काम नीट करा, नाहीतर नोकरी जाऊ शकते – आयुक्त हर्डीकर
    जे अप्रगत विद्यार्थी आहेत, त्यांना अधिक वेळ देणे गरजेचे आहे. काहीवेळा शिक्षक शिकवताना कमी पडत असल्यास तुम्ही त्याकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे. विद्यार्थी आणि शिक्षक ही सर्वस्वी मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. अप्रगत विद्यार्थ्यांकडे शाळेच्या वेळेच्याव्यतिरीक्तचा वेळ द्यायला हवा. आपल्या शाळा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या असून येत्या काळात प्रत्येक शाळेत ई- क्लासरुम होणार आहे. तर विविध सुविधा विद्यार्थ्यांना देऊ केल्या आहेत. किमान संपादणूक विद्यार्थ्यांकडून करुन घेणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षांकरिता उत्तेजन देणे तुमची जबाबदारी आहे. पुढच्या 15 दिवसांत शाळेतील अप्रगत विद्यार्थी निवडा, असे आदेश आयुक्तांनी मुख्याध्यापकांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.