Pimpri : शाळेतून शिक्षकांनी उत्तम शास्त्रज्ञ घडवावेत -महादेव जानकर

एमपीसी न्यूज – शिक्षकांनी उत्तम अध्यापनातून भविष्यात शास्त्रज्ञ होणारे विद्यार्थी घडविले पाहिजेत. ही किमया केवळ शिक्षकच करू शकतो, असे मत महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक आणि शाळा पुरस्कार वितरणच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक जानकर यांनी केले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना जानकर म्हणाले, आपल्या अध्यापन पद्धतीत पारंपारिक पद्धतींपेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. श्रीमंत महापालिकेबरोबर बुद्धिवंत महापालिका अशी ओळख निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. शिक्षणासाठी प्रसंगी अधिक निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन महादेव जानकर यांनी दिले. केवळ शिक्षकामध्ये समाज घडविण्याची क्षमता असल्याने तेच सुसंस्कृत आणि आदर्श पिढी घडवू शकतात. अशा गुणवंत शिक्षकांच्या पाठीशी शासन आणि समाज नक्की उभा असेल.

यावेळी व्यासपीठावर खासदार अमर साबळे ,आमदार लक्ष्मण जगताप ,शिक्षण सचिव नंदकुमार साहेब , महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर , सदाशिव खाडे ,एकनाथ पवार ,विलास मडीगिरी ,मनीषा पवार, नाना काटे, जोत्स्ना शिंदे ,राहुल कलाटे , वैशाली काळभोर ,भाऊसाहेब भोईर ,नामदेव ढाके , योगिता नागरगोजे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.