Pimpri : अल्पवयीन आणि परवाना नसलेल्या वाहन चालकांवर कारवाई; पालकांचे पोलिसांकडून प्रबोधन

एमपीसी न्यूज – अल्पवयीन आणि परवाना नसलेल्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईस सुरवात केली आहे. अल्पवयीन चालकांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडून दंड वसूल करून पालकांचे प्रबोधनही पोलीस करणार आहेत.

रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होत आहेत. त्यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अल्पवयीन चालकांवर कारवाई करावी, असे आदेश गृहविभागाने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार विशेष मोहिमेअंतर्गत बुधवारपासून (दि. 19) शाळा, महाविद्यालयांबाहेर कारवाईस सुरवात झाली आहे.

अल्पवयीन दुचाकीस्वारास थांबवून पोलीस परवाना मागतात. तो नसल्यास वाहन जमा करतात. त्यांच्या पालकांना बोलावून घेतात आणि त्यांचे प्रबोधन करतात. दुचाकीच्या मालकाकडून आणि मुलांकडून प्रत्येकी पाचशे रुपये, या प्रमाणे हजार रुपयांचा दंड वसूल करतात. जॉय रायडिंगला आळा घालण्यासाठी वाहनांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत.

कारवाईसाठी अडविलेल्या दुचाकीचालकांनी, ‘तुम्ही दंड घ्या, पण पालकांना बोलावू नका’, अशी विनंती पोलिसांना केली. तर काहींनी आई-वडील दोघेही कामावर जात असल्याचे सांगितले. घरी गाडी पडून असते. उशीर झाल्याने मी दुचाकीवरून आलो, अशी कारणे देत ते सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत होते. तर काहींनी परवाना घरी असल्याचे सांगितले. वाहन जमा करून परवाना घेऊन येण्यास पोलिसांनी सांगितले. तेव्हा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.