Pimpri : तेजस्विनी कदम यांचे हळदी-कुंकू समारंभातून शक्तिप्रदर्शन

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्विनी कदम या पिंपरी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी पिंपरी येथे महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

महिला कुटुंबाचा कणा असून, ज्या समाजात महिलांना सन्मान आहे, तो समाज आज प्रगतीपथावर आहे. हा संदेश समाजापर्यंत पोहचवत स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी हा कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी मतदारसंघातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सुमारे दोन हजार महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून तेजस्विनी कदम यांनी मतदारसंघातील महिला बचत गटांसाठी सुरू केलेल्या उद्योगांमुळे महिला वर्गातून कदम यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कार्यक्रमात शहरातील स्त्रियांची सुरक्षितता आणि स्त्रियांचे आर्थिक सबलीकरण या दोन महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. “भारतातील बहुसंख्य स्त्रिया या घरकामात गुंतलेल्या असतात. कमी उत्पादकेची व कमी कौशल्याची कामे स्त्रियांकडे दिली जातात. म्हणून स्त्रियांना आर्थिक क्षेत्रात दुय्यम स्थान दिले जाते. त्यामुळे महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होण्याचे प्रमाण व वेग कमी आहे. महिला देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे. ही शक्ती सदृढ अंडी सक्षम बनवणे समाजाची जबाबदारी आहे. महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे ही काळाची गरज आहे”, असे कदम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.