Pimpri: यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा; सहावेळा मुदतवाढ तरीही आठच निविदा प्राप्त; निविदा भरु दिल्या नाही की कंत्राटदारच आले नाहीत?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 647 कोटी रुपयांच्या निविदेला तब्बल सहावेळा मुदतवाढ देऊनही केवळ आठच जणांनी निविदा सादर केल्या आहेत. देश पातळीवर निविदा प्रसिद्ध करुन आणि सहावेळा मुदतवाढ देऊनही आठच निविदा आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निविदा भरु दिल्या नाही की, कंत्राटदारच आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महापालिकेत राजकीय नेत्यांकडून बाहेरील लोकांना निविदा भरु दिल्या जात नाहीत. कामे मिळू दिली जात नसल्याच्या होणा-या आरोपाला यामुळे बळ मिळत आहे.

महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्ते साफसफाई कामासाठी सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 8 वर्ष कालावधीसाठी निविदा काढण्यात आली आहे. 647 कोटी रुपयांच्या कंत्राटात ‘रिंग’ झाल्याचे सकृतदर्शनी उघड झाले असून 6 पॅकेजसाठी 6 कंत्राटदारांनीच आलटून पालटून सहभाग घेतल्याचे तांत्रिक छाननीद्वारे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निविदा रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईची निविदा टंडन अर्बन सोल्यूशन प्रा.लि या संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे. सात वर्षाचा निविदा कालावधी आहे. या निविदेनुसार 1196 कर्मचारी विविध कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. महापालिकेने देशपातळीवर याबाबतची निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेला सहावेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरी, देखील केवळ आठ निविदाधारकांनी निविदा सादर केल्या आहेत.

या निविदांमध्ये भाग घेतलेल्या संस्थांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे कामकाज सुरु आहे. ते पुर्ण झाल्यानंतर दुसरा लिफाफा उघडण्यात येणार आहे, असे उत्तर आरोग्य विभागाने तक्रार करणा-या लोकप्रतिनीधींना पत्राद्वारे उत्तर दिले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like