Pimpri : ‘थॅलेसेमिया’ रूग्णांना मिळेना रक्त ; ब्लड बँकांचे नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – थॅलेसेमिया रूग्णांमध्ये नवीन रक्त तयार होत नसल्याने अशा रुग्णांचे रक्त वारंवार बदलने आवश्यक असते. मात्र, शहरात अपुरा रक्तसाठा असल्यामुळे या रुग्णांना रक्त मिळेनासे झाले आहे.

थॅलेसेमिया रूग्णांमध्ये नवीन रक्त तयार करण्याची क्षमता नसल्यामुळे अशा रुग्णांचे रक्त 15 ते 30 दिवसांच्या अंतराने बदलावे लागते. मात्र, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे शहरात रक्त मिळेनासे झाले आहे. रक्तपेढ्यात सुद्धा अपुरा रक्तसाठा असल्यामुळे या रुग्णांना रक्त पुरवायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लाॅकडाऊनमुळे रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केली जात नाहीत. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.

वायसीएम आणि ससून रुग्णालयात रक्तदानाची व्यवस्था आहे. मात्र, नागरिक कोरोनाच्या भितीने तिथे जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी रक्तपेढीत अथवा रक्तदान शिबीराच्या माध्यमातून रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे.

अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 8 ते 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

‘सध्या 40 थॅलेसेमिया रूग्णांना नवीन रक्ताची गरज आहे. या रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे आवश्यक आहे. या रुग्णांना नियमित रक्त मिळण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे अत्यंत आवश्यक आहे’.

त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन ‘पिंपरी सेराॅलाॅजिकल इन्स्टिट्युट’चे दीपक पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.