Pimpri: नेहरुनगर येथील एक हजार बेडचे जम्बो रुग्णालय 20 ऑगस्टपर्यंत होणार कार्यान्वित

पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती : The 1,000-bed Jumbo Hospital at Nehrunagar will be operational by August 20

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिममध्ये ऑक्सीजन, आयसीयू बेडची सुविधा असलेल्या एक हजार बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे. राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडीए आणि  जिल्हाधिकारी कार्यालय एकत्रितपणे रुग्णालय उभारत आहे. हे रुग्णालय 20 ऑगस्टपर्यंत तयार होईल, अशी माहिती पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

जिल्ह्यातील  रुग्णांवर येथे उपचार केले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाढीचा आलेख उंचावतच आहे. भविष्यातील रुग्णवाढीचा अंदाज घेऊन राज्य सरकार, दोनही पालिका, जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए जम्बो सुविधांची निर्मिती करत आहे.

याबाबतची माहिती देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि जिल्हाधिकारी कार्यालय एकत्रितपणे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिममध्ये जम्बो रुग्णालय उभारत आहोत.

स्टेडियमची जागा तब्बल सव्वा पाच एकर आहे.  याठिकाणी 1 हजार बेडची सुविधा निर्माण केली जाणार आहे. त्यामध्ये आयसीयूचे 200 आणि ऑक्सीजनचे 800 बेड असणार आहेत.

पुढील सहा महिन्यांकरिता या रुग्णालयाच्या कामासाठी 70 कोटी रुपयांपर्यंत खर्च येईल. त्यासाठी राज्य सरकारची 50 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. उर्वरित 50 कोटींचा निधी पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालय एकत्रितपणे देणार आहेत.

20 तारखेपर्यंत हे रुग्णालय पूर्ण होईल. जिल्ह्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येवू शकतील. जिल्ह्यासाठी ही सुविधा उपलब्ध करत आहोत. शहरात असल्याने पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांना त्याचा जास्तीत-जास्त फायदा होईल.

तसेच जिल्ह्यासाठी एकत्रितपणे शिवाजीनगर येथील  इंजिनिअरिंग कॉलेज (सीओपी) च्या मैदानावर एक हजार बेडचे आणखी एक रुग्णालय उभारण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील रुग्णसंख्या 15 ऑगस्टपर्यंत 50 हजार होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने महापालिका देखील स्वतंत्र उपाययोजना करत असल्याचे सांगत आयुक्त म्हणाले, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे 50 आयसीयू आणि 150 ऑक्सीजन बेड तयार करत आहोत.

भोसरीतील बालनगरीत 425 बेडची निर्मिती करत आहोत. शहरातील 33 हॉस्पीटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये वाढ झाली असून आता 18 सेंटर कार्यान्वित आहेत.

त्यामुळे भविष्यात बेडची काही अडचण येणार नाही. खासगी रुग्णालये, हॉटेलमध्ये देखील सोय केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.