Pimpri : वृद्ध दांपत्याची कोट्यवधींची फसवणूक करणा-या आरोपीला पिंपरीत बेड्या

कोंढवा पोलीस ठाण्यातील चार वर्षांपासून फरार आरोपी

एमपीसी न्यूज – वृद्ध दांपत्याच्या परस्पर त्यांची जमीन कोट्यावधी रुपयांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड शहरात वल्लभनगर एसटी स्टँड परिसरातून अटक करण्यात आली. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली.
अशोक मुत्तु पिल्ले (वय 48, रा. कैलास कुटीर सोसायटी, औंधरोड, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील फातिमानगर परिसरात राहणारे वृद्ध दांपत्य अब्राहम थॉमस आणि सुझन यांची कोंढवा बुद्रुक येथे 40 गुंठे जमीन आहे. या जमिनीतील 20 गुंठे जमीन आरोपी पिल्ले याने स्वतःच्या नावाने बनावट पॉवर ऑफ ऍटर्नी तयार करून सरताज शेख याला एक कोटी रुपयांना विकली. या व्यवहारात महेश शिंदे, संजय आल्हाट यांनी मदत केली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 2015 साली फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी कोंढवा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. मात्र चार वर्षांपासून मुख्य आरोपी पिल्ले फरार होता.

पोलीस नाईक अमित गायकवाड यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील फरार आरोपी पिल्ले वल्लभनगर एसटी स्टँड परिसरात थांबला आहे.
त्याने राखाडी रंगाचे जॅकेट व काळ्या रंगाची जीन्स घातली आहे. त्यानुसार सापळा रचून युनिट एकच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी कवळी असता त्याने गुन्हा केल्याचे सांगितले. त्यावरून त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला कोंढवा पोलिसांकडे देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ. पोलीस नाईक अमित गायकवाड, प्रमोद हिरळकार, सुनिल चौधरी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.