Pimpri : शिवाजीनगर न्यायालय परिसरात गोळीबार करणारे रावण टोळीतील आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर न्यायालय परिसरात गोळीबार करणारे रावण साम्राज्य टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली. रोहन राजू चंदेलिया (वय 20, रा. रावेत) आणि अशोक उत्तरेश्वर कसबे (वय 24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकचे पथक दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींची तपासणी करत असताना पोलीस कर्मचारी सचिन मोरे आणि सावन राठोड यांना माहिती मिळाली की, गुरुवार (दि. 7) रोजी शिवाजीनगर न्यायालयात गोळीबार झाला. त्यातील आरोपी रावेत स्मशानभूमी परिसरात आहेत. त्यानुसार सापळा रचून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आरोपी रोहन आणि अशोक यांना तब्यत घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा आणखी एक साथीदार अक्षय साबळे हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  • अटक केलेले दोन्ही आरोपी रावण साम्राज्य टोळीचे सदस्य आणि अट्टल गुन्हेगार आहेत. आरोपी रोहन चंदेलीया याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नचे दोन, निगडी पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक आणि देहूरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा एक असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी अशोक कसबे याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक, देहूरोड आणि चिखली पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टचे प्रत्येकी एक असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी प्रमोद वेताळ, सावन राठोड, सचिन मोरे, गणेश सावंत, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.

  • काय आहे शिवाजीनगर न्यायालय परिसरातील गोळीबार प्रकरण ?
    महाकाली टोळीचा म्होरक्या राकेश ऊर्फ महाकाली ढकोलीया याचा एन्काउंटर झाला. त्यानंतर त्याच्या टोळीमध्ये वर्चस्वासाठी फूट पडून अनिकेत जाधव आणि विनोद गायकवाड यांनी रावण साम्राज्य टोळी तयार केली. तसेच हणम्या शिंदे आणि सोन्या काळभोर यांनी एस. के. ग्रुप नावाची स्वतंत्र टोळी तयार केली. त्या दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वावरून वारंवार वाद होऊ लागले. सन २०१७ मध्ये अनिकेत जाधव आणि विनोद गायकवाड यांच्या रावण साम्राज्य टोळीने हणम्या शिंदे याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली होती. त्यामध्ये हणम्या शिंदे थोडक्यात बचावला होता.

त्यानंतर लगेच 15 दिवसांनी हणम्या शिंदे आणि सोन्या काळभोर यांच्या एस. के. ग्रुप टोळीने त्याचा बदला म्हणून रावण साम्राज्य टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा खून केला. त्यानंतर दोन्ही टोळ्यांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. या मोक्क्यामध्ये फरार असलेला रावण साम्राज्य टोळीतील विनोद गायकवाड आणि त्याच्या साथीदारांना दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यात वाकड पोलिसांनी अटक केली. त्या गुन्ह्यामध्ये हणम्या शिंदे यांच्या टोळीचा सूरज वाघमारे हा साक्षीदार होता.

  • 7 मार्च रोजी सुरज वाघमारे हा वरील गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी त्याच्या 15 ते 20 साथीदारांसह शिवाजीनगर न्यायालयात आला होता. त्यावेळी रावण साम्राज्य टोळीतील मोक्का आणि दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यात फरार असलेला अक्षय साबळे, रोहन चंदेलीया, अशोक कसबे हे सुद्धा मोटार सायकलवरून ट्रिपलसीट शिवाजीनगर न्यायालय परिसरात आले होते. सूरज वाघमारे आणि त्याचे साथीदार आणि मोटारसायकलवरून ट्रिपलसीट आलेले तिघे यांच्यामध्ये नजरानजर झाली आणि सूरज वाघमारे याच्या एका साथीदाराने अक्षय साबळे याच्या गाडीवर दगड मारला. त्याचा राग आल्याने अक्षय साबळे याने त्याच्याजवळ असलेल्या पिस्टलमधून सूरज वाघमारे याच्या साथीदारांच्या दिशेने फायरिंग केले.

यानंतर फायरिंग करणारे आरोपी पसार झाले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फायरिंग आणि खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांसह पिंपरी-चिंचवड पोलीस आरोपींच्या मागावर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.