Pimpri : रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

The accused, who escaped from the hospital, was arrested by the crime branch

एमपीसी न्यूज – पोलीस कोठडी मिळालेल्या तीन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणले असता एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले होते. तर अन्य दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळून गेलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे.

कृष्णा उत्तम सोनवणे (वय 19, रा. तापकीर मळा, चर्च समोर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत.

वाकड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आर. एस. मुदल आणि चार कर्मचारी हे गंभीर स्वरूपाची दुखापत करणे, या गुन्ह्याखाली अटक केलेल्या आरोपींना घेऊन मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता आले होते.

तेव्हा तीन आरोपींनी गोंधळ घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन आरोपींना पोलिसांनी तत्परता दाखवत जागीच जेरबंद केले. तर आरोपी कृष्णा सोनवणे याने धूम ठोकली होती.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी पळून गेल्यानंतर तो नाशिकफाटा येथे गेला. जवळ पैसे नसल्याने त्याने एका वाहनचालकाकडे मदत मागितली.

तेथून तो मोशी येथे गेला. एका मित्राकडून पैसे घेऊन तो बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता.

 याबाबत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपी कृष्णा सोनवणे याला मंगळवारी रात्री अटक केली आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे,  कर्मचारी सचिन उगले, विजय मोरे,  खेसे,  गणेश सावंत यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.