Pimpri: प्रकल्पाचे सुधारित नकाशे वेळेत सादर न केल्याने वास्तुविशारदाची नेमणूक रद्द

एमपीसी न्यूज – चिंचवड, संभाजीनगर येथील बस टर्मिनल आरक्षण विकसित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने वास्तुविशारद म्हणून नेमणूक केलेल्या मेसर्स पी. के. दास या ठेकेदाराची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे सुधारित नकाशे व अंदाजपत्रक वेळेत सादर न केल्याने ही कारवाई केली आहे. त्याऐवजी मेसर्स के.बी.पी. सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या ठेकेदार संस्थेला हे काम देण्यात आले आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड, संभाजीनगर प्रभाग क्र. 9 मधील भूखंड आरक्षण क्र. 132 नुसार बस टर्मिनलसाठी आरक्षित केला आहे. त्याकरिता सन 2013-14 पर्यंत या कामाचा विकास आराखडा विशेष योजनाअंतर्गत टप्पा क्रमांक दोनमध्ये समावेश करण्यात आला होता. या कामामध्ये बस टर्मिनल व इतर अनुषंगिक कामाचा समावेश करण्यात आला होता. या कामासाठी वास्तुविशारद म्हणून मेसर्स पी.के. दास या ठेकेदार संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. त्याचबरोबर नकाशे आणि अंदापत्रक तयार करण्याचे कामा याच ठेकेदार संस्थेला देण्यात आले होते.  त्याकरिता महापालिका आयुक्‍तांच्या मान्य प्रस्तावानुसार केलेल्या कामाचे कौन्सिल ऑफ आर्किटेक्‍टनुसार 25 लाख रुपये या संस्थेला महापालिकेने अदा केले आहेत.

  • यापुर्वी 31 ऑगस्ट 2018 रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीत या कामामध्ये प्रगती होत नसल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यानुसार या कामाचे सुधारित नकाशे आणि अंदाजपत्रके आठ दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याबाबत प्रशासनाकडून सतत पाठपुरवा घेतला जात असतानादेखील या संस्थेकडून प्रशासनाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधूनही त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे 14 डिसेंबर 2018 रोजी मेसर्स पी. के. दास या संस्थेची नियुक्‍ती रद्द करण्यात आली आहे.

हा प्रकल्प वैशिष्ठ्यपूर्ण असल्याने तांत्रिकदृष्टया प्रकल्पाची संकल्प चित्रे, प्रकल्प आराखडे तयार करणे, बांधकाम परवानगी घेणे, पूर्वगणन पत्रक, निविदा विषयक कामे व निविदापूर्व कामे करण्यासाठी आर्किटेक्‍टची नेमणूक करणे आवश्‍यक आहे. याशिवाय आराखड्याप्रमाणे काम करुन घेणे व त्यांची मोजमापे घेऊन देयके तयार करणे, प्रकल्पाच्या दैनंदिन कामावर देखरेख करणे, निविदा पश्‍चात कामे करणे आवश्‍यक आहे. महापालिका आस्थापनावर कार्यरत असलेल्या अभियंत्यांकडे असलेल्या कामाचा व्याप पाहता, त्यांच्याकडून ही सर्व कामे परिणामकारक होण्याची शक्‍यता वाटत नाही.

  • त्यामुळे या सर्व कामांसाठी वास्तुविशारद आणि प्रकल्प सल्लागार असणे आवश्‍यक आहे, असा अभिप्राय नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार मेसर्स के.बी.पी. सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या ठेकेदार संस्थेने ही कामे करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार या संस्थेला ऑडीटोरियम वगळून पुन्हा बांधकाम परवानगी घेऊन, पूर्ण अंदाजपत्रक व निविदा कार्यवाही करावी लागणार आहे. निविदापूर्व आणि निविदा पश्‍चात कामासाठी वास्तुविशारद कामासाठी 1.81 टक्के तर प्रकल्प सल्लागार म्हणून 1.35 टक्के फी अदा केली जाणार आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.