Pimpri : पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गास स्थायी समितीची मान्यता

पुणे मेट्रोचे पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नामकरण करा; स्थायी समितीच्या सभेत मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते भक्ती शक्ती चौक निगडी या मार्गाचा डीपीआर मेट्रो कडून महापालिकेला सादर करण्यात आला. मेट्रो कडून सादर करण्यात आलेल्या डीपीआरला पिंपरी-चिंचवड स्थायी समितीने मान्यता दिली असून हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पुणे मेट्रो ऐवजी पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नाव करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. या कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते भक्ती शक्ती चौक निगडी या 4.413 किलोमीटर लांबीच्या विस्तारित मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे तीन स्टेशन करण्यात येणार आहेत. या विस्तारित मार्गासाठी एकूण 1 हजार 253 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. यातील 621 कोटी रुपये राज्य आणि केंद्र सरकारकडून देण्यात येणार असून महापालिकेला 147 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते भक्ती शक्ती चौक निगडी या मार्गावरील बहुतांश अंतर सार्वजनिक जागेतून मेट्रो धावणार आहे. तर काही अंतरासाठी खाजगी जागांचे अधिग्रहण करावे लागणार आहे. या जागांच्या अधिग्रहणासाठी 198 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच 65 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) आणि 65 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) म्हणून द्यावे लागणार आहेत.

या संपूर्ण खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली असून हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.