Pimpri : संतपीठाच्या कामातील ‘रिंग’ची’अ‍ॅडिओ क्लिप’ सभागृहात वाजविणार – दत्ता साने 

देवाच्या कामात देखील भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’च्या कामात ‘रिंग’ झाली आहे. ‘रिंग’ करुनच वाढीव खर्चाची निविदा भरण्यात आली असून त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. ‘रिंग’ झाल्याची ‘अ‍ॅडिओ क्लिप’ महासभेत वाजवून भाजपला भ्रष्टाचाराचा पुरावा देणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला. तसेच देवाच्या कामात देखील सत्ताधारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोपही साने यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना साने म्हणाले, ‘संतपीठाच्या कामामध्ये ‘रिंग’ झाली आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. महासभेत ते पुरावे सादर करणार आहे. भाजपने देवाच्या कामात देखील पैसे खालले आहेत. दिवसाढवळ्या ‘ऑन’ पेपर दरोडा टाकण्याचे काम भाजपकडून सुरु आहे. संतपीठाची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची होती. आमच्याच काळात त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी लागणारी जागा देखील आम्ही ताब्यात घेतली.

‘संतपीठाचे आज जे श्रेय घेवू पाहत आहेत. ते त्यावेळी आमच्या पक्षात होते. आता भाजपमध्ये सत्तेत असतानाही त्यांना संतपीठाची उर्वरित जागा ताब्यात घेता येत नाही आणि ते कामाचे श्रेय घेत आहेत. गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असूनही संतपीठासाठी आवश्यक असणारी उर्वरित जागा त्यांना दीड वर्षात ताब्यात घेता आली नाही. त्यांचे हे अपयश आहे’, असे साने म्हणाले.

राष्ट्रवादीची सत्ता असताना समिती स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या समितीवर चिखलीगावातील नागरिक, आळंदी, देहूतील अभ्यासू व्यक्ती यांच्यासह महापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते आणि स्थानिक नगरसेवक यांना घेण्याचा ठराव करण्यात आला होता. पंरतु, भाजपने त्यामध्ये देखील बदल केला असून आपल्या विचाराच्या लोकांना समितीत घेतल्याचा आरोपही, साने यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.