Pimpri: कौतुकास्पद ! बावेजा दाम्पत्यानं लॉकडाऊनच्या काळात वाटले 35 हजार सॅनिटरी पॅड

Pimpri: Admirable The Baweja couple distributes 35,000 sanitary pads during the lockdown झोपडपट्टी, बांधकाम साईट वर काम करणाऱ्या महिला, स्थलांतर करणाऱ्या महिला तसेच पुण्यातील रेड लाईट परिसरातील महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध होत नव्हते.

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनमध्ये महिलांच्या मासिक धर्माच्या काळात आवश्यक असलेले सॅनिटरी पॅड सहज उपलब्ध होत नव्हते. तसेच हा विषय अतिशय नाजूक असून या काळात महिलांना अधिक स्वच्छता आणि काळजी घेण्याची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन सॅनिटरी पॅड वितरणाचे काम बावेजा दाम्पत्याने हातात घेतले.

योगेश बावेजा आणि गुरप्रीत बावेजा असे या दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विविध भागात जाऊन आजवर तब्बल 35 हजार सॅनिटरी पॅडचे वितरण केले आहे. या कामासाठी 13 लाखाचे कर्ज बॅंकेकडून घेतले असल्याचे योगेश बावेजा यांनी सांगितले.

योगेश बावेजा यांना त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल आम्ही जेव्हां विचारल तेव्हा ते म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये महिलांच्या मासिक धर्माच्या काळात आवश्यक असलेले सॅनिटरी पॅड सहज उपलब्ध होत नव्हते.

झोपडपट्टी, बांधकाम साईट वर काम करणाऱ्या महिला, स्थलांतर करणाऱ्या महिला तसेच पुण्यातील रेड लाईट परिसरातील महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध होत नव्हते.

तसेच झोपडपट्टीतील काही महिलांना याबाबत फारशी माहितीही नाही. कोरोना संकट काही लगेच संपणार नाही, हे लक्षात घेऊन आम्ही सॅनिटरी पॅड वाटप करण्याचे काम हाती घेतले.

पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विविध भागात जाऊन आम्ही गरीब व गरजू महिला व मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप केले. या भागात फिरत असताना झोपडपट्टीतील बऱ्याच महिलांना याच्या वापराबद्दल माहिती नसल्याचे दिसून आले.

त्यांचा त्यांना वापर आणि महत्व पटवून दिले. महिलांना मासिक धर्माच्या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे असते. त्यात कोरोना संसर्गाची भीती सुद्धा आहे त्यामुळे आम्ही दोघांनी हे काम करायचे ठरवलं असं योगेश बावेजा सांगतात.

आपल्या समाजात महिलांच्या मासिक धर्माबद्दल आणि येणाऱ्या अडचणीबद्दल खुलेपणानं चर्चा केली जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. आम्ही हे वाटप निस्वार्थी आणि सामाजिक भावनेतून केल्याचे बावेजा दाम्पत्य सांगतात. प्रत्येकाने आपल्या परिने समाजासाठी आपल्या क्षमतेनुसार मदत करायला हवी, असे बावेजा दाम्पत्य म्हणाले.

कोण आहेत बावेजा दाम्पत्य ?

योगेश बावेजा हे एका खासगी फायनान्स कंपनीत व्यवस्थापक आहेत. तर त्यांची पत्नी गुरप्रीत बावेजा या आयटी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.