Pimpri: प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधणा-यांना भाजपकडून सत्तेचा गैरवापर करुन अटक – अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामे, रिंगरोड, शास्तीकर या प्रलंबित प्रश्नांकडे नागरिकांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निदर्शने केली असता भाजपने सत्तेचा गैरवापर करुन त्यांना अटक केली. हे लोकशीहीत योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (सोमवारी) केली. तसेच आमच्या काळातही आंदोलने झाली. पण, आम्ही सत्तेचा असा माज कधी दाखवला नाही असेही ते म्हणाले.

भाजपच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारी (दि.13) शहरात आल्या होत्या. थेरगाव येथे त्यांची सभा झाली होती. सभा चालू असताना रहिवाशांनी प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. मात्र, त्यांना अटक करण्यात आली. त्यावरुन अजित पवार यांनी आज भाजपवर जोरदार टीका केली.

यावेळी पवार म्हणाले, भाजपने सर्वांची फसवणूक केली आहे. मित्रपक्षांनाही फसवले आहे. त्यांना त्यांच्या चिन्हावर लढू दिले नाही. कडकनाथ कोंबडी सदाशिव खोत यांना सोडेना, अशी अवस्था त्यांची झाली आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

कारखान्याला मदत देतो, बँकेला मदत करतो, चौकशी थांबवतो, मदत न केल्यास प्लॉटवर आरक्षण टाकतो असे सांगून भाजप विरोधकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळे प्रकार थांबविण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहनही पवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.