Pimpri: चायनिज वस्तूंवर निर्बंध घालण्याची उद्योजकांची मागणी

एमपीसी न्यूज – वॉलमार्ट, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या सारख्यांना विरोध दर्शवितानाच चायनिज वस्तूंवर निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी विविध उद्योजकांनी केली आहे.उद्योजकांच्या विविध संघटनांचा सहभाग असलेल्या फेडरेशन ऑफ असोशिएशन ऑफ पिंपरी-चिंचवडची बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी विविध उद्योजकांनी ही मागणी केली.

यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष, माजी खासदार गजानन बाबर यांच्या अध्यक्षतेखाली हायवे टॉवर्स, चिंचवड येथे झालेल्या या बैठकीला पिंपरी-चिंचवड ऑफ कॉमर्सचे विनोद बन्सल, सीए अकाऊंटट असोशिएशनचे के. जे बन्सल, प्लाय अँड लॅमिनेट असोशिएशनचे अध्यक्ष गंगाराम पटेल, इंडस्ट्रिअल टूल ट्रेडर्स असोशिएशनचे विनोद जैन, मावळ असोशिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सुरेश मोहीते, पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळाचे अध्यक्ष गोविंद पानसरे, तसेच अन्य संघटनांचे सुमारे पंचवीस पदाधिकारी आदी उपस्थित होते.

  • शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सत्तेत येत आहे. त्याअनुषंगाने नव्या सरकारचे अभिनंदन करतानाच औद्योगिक मंदीबाबत चर्चा करून विविध उपाययोजना या बैठकीत सुचविण्यात आल्या. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशात उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मंदीची लाट आहे.

अशातच केंद्र सरकारने 100 टक्के परदेशिय गुंतवणुकीला मान्यता दिल्यामुळे वॉलमार्ट, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या सारख्या, तसेच नव्यानेच या क्षेत्रात येणा-या रिलायन्स समूहामुळे व्यापार, उद्योग क्षेत्रात भिती व्यक्त केली जात आहे.

  • त्यामुळे या सा-यांना फेडरेशनच्या बैठकीत विरोध दर्शविला आहे. त्याचप्रमाणे 100 टक्के परकिय गुंतवणूक धोरणाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा, परकिय गुंतवणूकीला परवानगी देताना काही अटी-शर्ती घालाव्यात, जेणेकरून छोटे उद्योग, व्यावसायाला धोका निर्माण होणार नाही.

देशांतर्गत 5 व 12 टक्के असे दोन जीएसटीचे स्लॅब असावेत, सर्व्हिसेस सेवा उद्योग जीएसटी कमी करून उद्योग, व्यवसाय, व्यापाराला चालना द्यावी, चायनिज वस्तूंवर भारतीय बाजारपेठेत निर्बंध घालावेत, अशी मागणीही या बैठकीमध्ये करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.