Pimpri: शहरात खुलेआम मटका सुरु, पोलीसांचे अक्ष्यम दुर्लक्ष; पालिका सभागृह नेत्याचा आरोप

The city began to open matka , the police inexplicably ignored; Allegation of Municipal Assembly Leader

एमपीसी न्यूज – औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात ओपन आणि  क्लोज मटका चांगलाच जोमात चालला आहे. लाखो रुपयांच्या उलाढाली बरोबर वरिष्ठांचे  उखळ पांढरे करणार्‍या व अनेकांची घरे व कुटुंबे  उध्वस्त करणारा हा मटका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? असा सवाल पालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी उपस्थित केला.

याबाबतची माहिती देताना सभागृह नेते ढाके म्हणाले, सांगवी भागातील नदीलगतच्या भागात मॉन्सून पूर्व पूर नियंत्रण कामाची पाहणी करीत असताना त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या.

प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता काही जणाकडे असणाऱ्या मटक्याच्या चिठ्ठ्या, रोख रक्कम व तत्सम साहित्य त्याच ठिकाणी टाकून संबंधित पसार झाले. तसेच त्या ठिकाणी विविध मटका बाजाराचे बोर्ड लावलेले व त्यावर ओपन क्लोज नंबर असलेले आढळून आले.

अशाच प्रकारे शहरात अवैध मटका, जुगार, सोरट असे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात  सुरु असणार आहेत. शहरात कोरोनाचे सावट असताना याकडे मात्र पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गरीबांना शोषित केले जात आहे. याकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला.

शहरातील अशा प्रकारचे मटक्याचे धंदे अनेक ठिकाणी सुरु असण्याची शक्यता आहे. मटक्यामुळे या शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांचे   संसार उध्वस्त झाले असून  मटक्यासाठी  अनेक  कुटुंबात कौटुंबिक कलह वाढत आहेत.

हे असेच सुरु राहिले तर अनेक गोरगरीब कुटुंबे व शहरातील युवक यामुळे  बरबाद  होण्याची भिती आहे. पोलीस यंत्रणेने या अवैध मटका धंद्याकडे वेळीच लक्ष घालून    मटका धंदा   तातडीने बंद करावा, अशी मागणी ढाके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.