Pimpri: सत्ताधा-यांच्या मनमानी कारभारामुळे शहर कच-यात – पार्थ पवार

पंधरा दिवसात शहर कचरामुक्त करा; आयुक्त यांची घेतली भेट

एमपीसी न्यूज – बेस्ट सिटीने सन्मानित झालेले पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छेतच्या बाबतीत 52 व्या क्रमांकावर जाणे ही गंभीर बाब आहे. शहरात सर्वत्र कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोणत्या कारणामुळे ही परिस्थिती झाली आहे, हे शहरातील सुज्ञ जनतेला माहित आहे. सत्ताधा-यांचा मनमानी कारभार सुरु असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी केली. तसेच पंधरा दिवसात शहर कचरा मुक्त करा, अशी सूचनाही त्यांनी महापालिका आयुक्त यांना केली.

पार्थ पवार यांनी आज (सोमवारी) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. शहरातील कच-याची समस्या मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. पुढील पंधरा दिवसांत शहरातील कच-याची समस्या सुटलीच पाहिजे. शहर कचरामुक्त, दुर्गंधी मुक्त झालेच पाहिजे. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दररोज स्वच्छता झाली पाहिजे. कचरा संकलित करणा-या नवीन गाड्याची उंची जास्त असल्यामुळे त्यांची उंची कमी करण्यात यावी. जेणेकरून महिलांना कचरा टाकण्यास अडचण येणार नाही. प्रत्येक कच-याच्या गाडीवर एक मदतनीस नियुक्त करावा, अशा सूचना पार्थ यांनी आयुक्तांना केल्या.

  • दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील भाजी मंडई येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, राजू मिसाळ, प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, शेखर ओव्हाळ, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, खजिनदार संजय लंके, सरचिटणीस अमोल भोईटे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा कविता खराडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.