Pimpri: शहरातील कोरोना बाधितांचा मृत्यू दर 1.78 टक्के

The city's corona-related mortality rate is 1.78 percent

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील 14 जणांचा, तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 18 अशा 32 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना बाधितांचा मृत्यू दर 1.78 टक्के आहे. त्यामध्ये वाढ होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव तथा नोडल ऑफिसर महेश पाठक यांनी दिल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव तथा नोडल ऑफिसर महेश पाठक यांनी आज (सोमवारी) घेतली.

पाठक यांनी पालिकेच्या कोविड-19 वॉर रुमला त्यांनी भेट दिली. त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली.

यावेळी पीएमारडीएचे आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी डॉ. नीलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

शहरातील रुग्णवाढीचा दर व बरे होणार्‍या रुग्णांची तसेच शहरातील रुग्णालयात उपलब्ध असणार्‍या खाटांची माहिती त्यांनी घेतली.

रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी आवश्यक ती ॲम्ब्यूलन्स सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा प्रयत्न करावा व प्रतिक्षा कालावधी निश्चित करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. राबविलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.