Pimpri: ‘गार्बेज फ्री सिटी’ स्पर्धेत शहराचा ‘कचरा’; ‘पंचतारांकित’ दर्जा नाकारला

प्रशासनासह सत्ताधा-यांना धक्का

एमपीसी न्यूज – मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात घसरण होणा-या पिंपरी-चिंचवड शहराला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारच्या कचरामुक्त स्पर्धेत शहराचा ‘कचरा’ झाला असून शहराला पंचतारांकित (फाइव्ह स्टार रेटिंग) दर्जा नाकारला आहे. केंद्राकडून महापालिकेला साधा एक स्टारचाही दर्जा मिळाला नाही.  यामुळे स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च करणा-या प्रशासनाचा भांडाफोड झाला आहे. तर, महापालिकेत सत्ता आल्यापासून स्वच्छतेसह ‘कचरामुक्त’ स्पर्धेत महापालिका फेल झाल्याने भाजपलाही मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीच्या सत्तेत पिंपरी-चिंचवड शहराला बेस्ट सिटी पुरस्कार मिळाला होता. तसेच स्वच्छतेत 2016  मध्ये राज्यात पहिला, तर देशात नववा क्रमांक मिळाला होता. परंतु, भाजपची सत्ता आल्यापासून मागील तीन वर्षात स्वच्छ स्पर्धेत शहराचा कचरा होत आहे. 2017 मध्ये नवव्या क्रमांकावर असलेले शहर थेट 72 व्या नंबरवर फेकले होते.

तर, 2018 मध्ये देशात 43 व्या, तर राज्यात सहाव्या क्रमांकावर होते. त्यानंतर 2019 मध्ये देशात 52 वा तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता. स्वच्छतेवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करुनही शहराची घसरण सुरुच आहे. आता स्वच्छ सर्वेक्षणाचाच एक भाग असलेल्या ‘कचरामुक्त’ स्पर्धेतही शहराचा कचरा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा घेतली जाते. या वर्षीपासून त्यात कचरामुक्त शहरांसाठी मानांकनाचा समावेश केला होता. फाइव्ह स्टार, थ्री स्टार आणि वन स्टार अशा तीन स्वरूपात त्याची वर्गवारी करण्यात आली होती.

देशभरातील 1435 शहरांनी स्टार रेटिंगसाठी प्रस्ताव पाठविले होते. या रेटिंगसाठी कचरा प्रक्रिया, संकलन, वर्गीकरण 100 टक्के बंधनकारक करण्याचे निकष होते. त्याचबरोबर नदी, नाले, शहरातील तलाव यांची स्वच्छता, उपाययोजनांचा समावेश होता.

त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंत्रणेला कामाला लावले. त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला. महापालिकेने पंचतारांकित दर्जासाठी प्रस्ताव पाठविला. मात्र, देशातील इतर शहरांच्या तुलनेत स्वच्छतेच्या बाबतीत निश्चित केलेल्या निकषांमध्ये पिंपरी महापालिकेला स्थान मिळविता आले नाही.

कचरामुक्त शहरांसाठी या मानांकनात मिळालेल्या गुणांकनाचा स्वच्छ सर्वेक्षणाच्या मूळ निकालावर परिणाम होणार असल्याने  महापालिकेचा क्रमांक घसरण्याची चिन्हे आहेत. आगामी काही दिवसांत हा निकालही जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

कोणत्या मुद्द्यावर ‘पंचतारांकित’ दर्जा नाकारला याची खात्री करणार – आयुक्त

”कचरामुक्त शहरासाठीच्या सर्वच निकषांनुसार महापालिकेने फाइव्ह स्टार रेटिंगसाठी प्रस्ताव पाठविला होता. मात्र, दोन गोष्टीमध्ये शहर परिपुर्ण नसल्यामुळे केंद्र सरकारने फाइव्ह स्टार रेटिंग नाकारल्याचे सांगितले आहे.

त्यात ‘लॅन्डफिल’ (कचरा जमिनीत जिरवणे – भूभरण) आणि कच-याच्या दैनंदिन व्यवस्थापन प्रक्रियेत अडचण असल्याचे कळविले आहे. दररोज किती कच-यावर प्रक्रिया केली जाते. याचा वर्षभराचा ‘डेटा’ होता.

हा डेटा कागदोपत्री व्यवस्थित होतो. त्यामुळे पुन्हा विचारणा केली जाणार आहे. काही कन्फ्युजन झाले असेल तर विचारले जाईल. कचरा प्रक्रिया 100 टक्के करणे अपेक्षित होते. ते महापालिका करत आहे.

त्यामुळे तपासणीत काही चूक झाली का, याची शंका आहे. त्यामुळे खात्री केली जाईल. साईट सर्वेक्षणामध्ये काही कमतरता जाणवली का, याची खातरजमा केली जाणार आहे. खरोखरच काही उपाययोजना राहिल्या असतील. तर, त्या दुरुस्त केल्या जातील.

पण, त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर सुधारण होईल”, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका नेमकी कुठे कमी पडली. कोणत्या उणिवा राहिल्या याचा अभ्यास करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या जातील.

त्यात  सुधारणा करून पुढील काळात नक्कीच रेटिंगमध्ये सुधारणा होईल, असा विश्वास सभागृह नेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केला. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.