Pimpri: आचारसंहितेची ‘ऐसी की तैसी’; इच्छुकांचे झळकताहेत फलक, महापालिकेचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटला तरी पिंपरी-चिंचवड शहरात भाजप इच्छुकांचे फलक झळकत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर चोवीस तासात राजकीय फलक काढणे बंधनकारक आहे. परंतु, शहरात अनेक फलक झळकत असल्याचे दिसून येत असून महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.

विधानसभा निवडणुकीची शनिवारी (दि. 21) दुपारी बारा वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे राजकीय नेत्यांनी स्वत: फलक काढणे आवश्यक असते. परंतु, राजकीय नेत्यांनी फलक नाही, काढल्यास महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने ते फलक काढणे अपेक्षित असते. तसेच आचारसंहिता भंगाचा गुन्हा देखील दाखल करणे गरजेचे आहे.

आचारसंहितेपूर्वी सर्वपक्षीय इच्छुकांनी शहरात फलक लावले होते. इच्छुकांचे निवडणूक लढविणार असल्याचे फलक शहरात सर्वत्र झळकत होते. आचारसंहिता लागू झाल्यावर काही जणांनी फलक काढले. तर, अनेकांनी फलक काढण्याकडे दुर्लक्ष केले. पिंपरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांचे मोठे, छोटे फलक अद्यापही झळकत आहेत. आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस झाले. तरी, देखील फलक काढले गेले नाहीत. महापालिका प्रशासनाचे देखील भाजप इच्छुकांच्या फलकाकडे दुर्लक्ष आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील वाघमारे म्हणाले, ”आचारसंहिता लागू होताच महापालिकेने राजकीय फलक काढण्यास सुरुवात केली आहे. मोठे 82 फलक काढले आहेत. तर, किऑस्क (पोलवरील छोटे फलक) 400 काढले आहेत. पाच परवाना निरीक्षकामांर्फत हे फलक काढण्यात आले आहेत. शहरात कोठे फलक असतील. तर, तत्काळ काढले जातील. त्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात येईल. आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.