Pimpri: आयुक्तांच्या भाजप कार्यालय भेटीचे पडसाद; राष्ट्रवादीचे आंदोलन, स्थायी समिती तहकूब

काँग्रेसचा आयुक्तांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला

एमपीसी न्यूज – महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या भाजप कार्यालय भेटीमुळे महापालिका राजकारणात ‘गरमा-गरमीचा’ माहोल तयार झाला आहे. राष्ट्रवादीने आज आक्रमक पवित्रा घेत आयुक्त दालनाचे ‘भाजप आयुक्त’ दालन असे नामकरण केले. तर, आयुक्तांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करावा, असा सल्ला काँग्रेस, तसेच सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिला आहे. या तापलेल्या वातावरणात भाजपने आजची स्थायी समितीची सभा तहकूब करत आयुक्तांना वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आयुक्त हर्डीकर यांनी आज महापालिका मुख्यालयाकडे पाठ फिरवत ‘अ‍ॅटो क्लस्टर’ येथून प्रशासकीय कामकाज हाकणे पसंत केले.

शिष्टाचार संकेत बाजूला करत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि. 25) थेट भाजपच्या पक्ष कार्यालयात हजेरी लावली. भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बंद दाराआड ‘गुफ्तगू’ केले. आयुक्ताने राजकीय पक्षाच्या कार्यालयात जाण्याची महापालिका इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. आयुक्तांच्या भाजप कार्यालयाच्या भेटीचे महापालिका राजकारणात आज चांगलेच पडसाद उमटले आहेत.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्त दालनाचे ‘भाजप आयुक्त’ दालन असे नामकरण केले. आयुक्तांच्या कार्यालयावर भाजपचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’सह भाजप पक्ष कार्यालय, श्रावण हर्डीकर प्रवक्ते भाजप’ असे फलक लावले. आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्तांनी सर्वपक्षांच्या कार्यालयाला भेट द्यावी, अशी निमंत्रण पत्रिका तयार केली. त्यामध्ये आयुक्त हर्डीकर यांचा गळ्यात भाजपचे उपरणे घातलेला फोटो वापरण्यात आला आहे. ही पत्रिका कलाटे यांनी ‘सोशल मिडीयावर’ व्हायरल केली. काही वेळाताच हा फोटो सर्वत्र ‘व्हायरल’ झाला असून त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

  • काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, मनोज कांबळे, अशोक मोरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून आयुक्तांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करावा, असा सल्ला दिला आहे. आयुक्त हर्डीकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रशासकीय सेवा नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे हर्डीकर यांना आयुक्तपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहीला नाही. असे वर्तन करुन आयुक्तपदाच्या प्रतिमेस कलंकित केले आहे.यातून हर्डीकर यांचे भाजप विचारांप्रतीची आत्मीयता व प्रेम सुष्पटपणे उघड केले आहे. त्यामुळे हर्डीकर यांनी शहरवासियांची माफी मागून आयुक्तपदाचा राजीनामा द्यावा. भाजपमध्ये प्रवेश करुन आपली मनोकामना पूर्ण करावी. अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र स्वरुपाचे जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अस्थापना विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रीय सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी तक्रार केली आहे. सत्ताधारी भाजपचे घरगडी, दलाल, प्रवक्ते म्हणून काम करणारे पिंपरी महापालिकेचे भ्रष्ट आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची चौकशी करुन त्यांचे निलंबन करण्याची मागणी त्यांनी केली.

  • भारतीय प्रशासन सेवेमध्ये असणा-या सनदी अधिका-यांना अनेक बंधने असतात. कुठल्याही सनदी अधिका-यांना पक्षीय अथवा राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही. त्याकडे दुर्लक्ष करत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व संकेत राजशिष्टाचार पायदळी तुडवले. सनदी अधिकारी पेशाला कलंक ठरावा अशी कृती त्यांनी केली आहे. त्यांना भाजप प्रेमाचा इतका पुळका आला असेल तर सनदी सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी सरळ भाजपात प्रवेश करुन पक्षीय राजकारणाला सुरुवात करावी. मात्र, महापालिका आयुक्तांच्या खुर्चीवर बसून भाजपची वकिली, दलाली त्यांनी करणे हे सरळ-सरळ भारतीय प्रशासन सेवेमधील नियमांचे व सर्व संकेत, राजशिष्टाचाराचे उल्लंघन आहे, असे भापकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like