Pimpri: पालिकेची सोमवारी पहिल्यांदाच होणार ऑनलाईन महासभा

Pimpri: The corporation will hold its first online general meeting on Monday

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा सोमवारी (दि. 20) पहिल्यांदाच ऑनलाईन होणार आहे. पदाधिकारी, गटनेते सभागृहातून तर नगरसेवक ‘गुगल मिट’द्वारे आपल्या घरुन सभेत सहभागी होणार आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून काही महापालिकांच्या सर्वसाधारण सभा, विषय समिती सभा झालेल्या नाहीत. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार तीन महिन्यात सर्वसाधारण सभा न झाल्यास नगरसेवक पद रद्द होण्याची तरतूद आहे. त्यामुळे पिंपरी पालिकेच्या मार्च, एप्रिलच्या तहकूब सभा जून महिन्याच्या सुरुवातीला झाल्या. पण, जून महिन्याची सर्वसाधारण सभा झाली नव्हती.

कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादुर्भाव विचारात घेता राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायंतीनी विषय समिती सभा, सर्वसाधारण सभा नियमितपणे घ्याव्यात. त्यासाठी व्हिडीओ कॉन्फरस माध्यमाचा अवलंब करावा, असे स्पष्ट आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे पिंपरी पालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.20) ऑनलाईन होणार आहे.  महापौर, आयुक्त, नगरसचिव, पदाधिकारी आणि गटनेते सभागृहातून तर उर्वरित नगरसेवक ‘गुगलमिटद्वारे’ आपल्या घरुन सभेत सहभागी होणार आहेत.

याबाबत नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ”राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारी ऑनलाईन सभा होणार आहे. नगरसेवकांना गुगल मिटची लिंक दिली आहे.  सभा सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटे लिंक अॅक्टीव्ह होईल. पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी येवू नयेत. यासाठी आमचा प्रयत्न राहील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.