Pimpri: कचराप्रश्नी ‘ईसीए’चा उपोषणाचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतेचे बारा वाजले आहेत. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच स्वच्छतेचे नियोजन बिघडले आहे. शहर स्वच्छतेत सकारात्मक बदल दिसून आला नाही. तर, दिवाळीनंतर आरोग्य विभागात उपोषणास बसण्याचा इशारा पर्यावरण संवर्धन समितीचे (ईसीए) अध्यक्ष विकास पाटील यांनी दिला आहे.

याबाबत विकास पाटील यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सरकारच्या नियमाप्रमाणे ओला आणि सुका कचरा वेगळा देणाऱ्या नागरिकांच्या समोरच सर्व कचरा एकाच गाडीतून वाहून नेला जातो. शहरात निर्माण होणारा इ-कचरा आरोग्य विभागाकडून संकलन केला जात नाही. त्यासाठी यंत्रणा का राबविली जात नाही? हा कचरा कोठे आणि कोणी जिरवायचा ? जुने कपडे व रेक्‍झीन मटेरीअलची कशी विल्हेवाट लावायची याची कोणतीही जबाबदारी आरोग्य विभाग घेत नाही.

शेजारच्या शहरातून गावातून येणा-या कच-यावर कोण नियंत्रण करणार?, भाजी मार्केटचा ओला कचरा वेगळा का उचलला जात नाही?, मटण व मच्छी मार्केटचा कचरा वेगवेगळा का उचलला जात नाही?. इमारती व बांधकाम कामातील राडारोडा विल्हेवाट पद्धतीबाबत नागरिकाना प्रबोधन का केले जात नाही?. हॉस्पीटल कचरा व त्याचे काय? या सर्व प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी दिवाळीनंतर आरोग्य विभागात उपोषणास बसणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.