Pimpri: महापालिकेच्या अर्थसंकल्पात पूल, ग्रेड सेपरटेरची कामे पूर्ण करण्यावर भर!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 627 कोटी 99 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) स्थायी समितीला सादर केला. त्यामध्ये नवीन प्रकल्पांपेक्षा चालू कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. केवळ निविदा न काढता चालू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद केलेली आहे. नवीन कामांसाठी कमी तरतूद असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. दरम्यान, अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सभापती विलास मडिगेरी म्हणाले.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात चालू असलेली प्रकल्पांची कामे करण्यावर भर देण्यात आला आहे. भक्ती-शक्ती चौकातील ग्रेड सेपरेटवर व उड्डाणपुल ऑगस्ट 2020 अखेर पुर्ण करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक, किवळे या संपूर्ण रस्त्यासाठी 10 कोटी 91 लाख रुपये, बोपखेल-आळंदी या रस्त्यासाठी 11 कोटी, रहाटणीतील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा चौकापर्यंत वर्तुळाकार रस्ता म्हणजे एचसीएमटीआर प्रकल्पासाठी 7 कोटी रुपयांची 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर रहाटणी येथे दोन समांतर समतल वितलग बांधण्यासाठी 12 कोटी, पुणे-नाशिक महामार्गावरील पांजरपोळ चौक ते आळंदी रस्त्यापर्यंतचा रस्ता रस्ता विकसित करण्यासाठी 13.83 कोटी तरतूद ठेवण्यात आली आहे. डांगे चौकातून हिंजवडीकडे जाणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चालू असलेल्या ग्रेड-सेपरेटरसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलासाठी 24 कोटी, शहरातील 30 किलोमीटर एचसीएमटीआर रस्त्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर नदी सुधार प्रकल्पासाठी 65 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे.

‘स्मार्ट सिटी’साठी 150, आवाससाठी 70, अमृत योजनेसाठी 81 कोटी!
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिस-या टप्प्यात शहराची निवड झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅन सिटी सोल्यूशन हे दोन घटक आहेत. स्मार्ट सिटीतील कामासाठी महापालिकेने 150 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 70 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय अमृत योजनेसाठी 81 कोटी 92 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नवीन कामांसाठी कमी तरतूद -आयुक्त श्रावण हर्डीकर
केवळ निविदा न काढता चालू असलेली प्रकल्पांची कामे पुर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. निर्धारित वेळेत कामे पुर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. निधी अभावी कामे रेंगाळणे योग्य नाही. त्यामुळे चालू असलेले प्रकल्प पुर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद केलेली आहे. नवीन कामांसाठी कमी तरतूद असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

सर्वसमावेशक अंदाजपत्रक -विलास मडिगेरी
अंदाजपत्रकात यंदा आरंभीची शिल्लक 861कोटी इतकी आहे. आरंभीची शिल्लक कमी असून, गेल्या वर्षी जास्तीत जास्त रक्कम खर्ची करण्यात आली आहे. त्यामुळे विकासात्मक योजनांचा चांगल्या प्रकारे गती दिल्याचे स्पष्ट आहे.तर यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये मोठ्या प्रकल्प किंवा उपक्रमाची घोषणा न करता शहर चांगले, नियोजनबद्ध कसे होईल याकडे लक्ष दिले आहे. ही गोष्ट कौतुकास्पद आहे. यंदाचे बजेट चांगले व सर्वसमावेश असल्याचे स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.