Pimpri: प्राधिकरणाच्या जागेतील अतिक्रमणे जागेसह नागरिकांच्या नावे होणार

मुख्यमंत्र्यांचा निर्णय; आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घरे जागेसह नागरिकांच्या नावे केली जाणार आहेत. अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांनी प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण केले असल्यास ते दंड न आकारता संबंधित नागरिकाच्या नावे करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधलेल्या सुमारे दीड लाख लोकांना फायदा होणार आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घरांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 1) मोठा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांनी प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण केले असल्यास ते दंड न आकारता संबंधित नागरिकाच्या नावे केले जाणार आहे. इतरांची 500 चौरस फुटांपर्यंतची जागा मोफत संबंधितांच्या नावावर केली जाणार आहे. 500 ते 1000 चौरस फुटांपर्यंतची अतिक्रमणाची जागा रेडीरेकनरच्या 10 टक्के, 1000 ते 1500 चौरस फुटांपर्यंतची अतिक्रमणाची जागा रेडीरेकनरच्या 25 टक्के दंड आकारून संबंधितांच्या मालकीची केली जाणार आहे. या निर्णयाचा प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधलेल्या सुमारे दीड लाख लोकांना फायदा होणार आहे.

  • 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली घरे संबंधित नागरिकांच्या नावांवर करण्याचा निर्णय घेऊन सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्याची मागणी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे दोन्ही प्रलंबित प्रश्न अधिका-यांकडून समजून घेतले.

शासकीय जागेतील अतिक्रमणे अधिकृत करून जागा संबंधित नागरिकांच्या नावांवर करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या जागेत अतिक्रमण करून घरे बांधली असल्यास ही घरे आणि जागा संबंधित नागरिकांच्या नावावर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरण प्रशासनाला दिल्याचे, आमदार जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.