Pimpri : पिंपरी-चिंचवडमधून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरुच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधून पूरग्रस्तांना अजूनही मदतीचा ओघ सुरु आहे. अतिवृष्टीमुळे सांगली – कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मंदिर, शारदानगर, चिखली या संस्थांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

त्यातून गहूआटा, ज्वारीपीठ, डाळ, तांदूळ असे सुमारे दोन टन धान्य, तेल डबे, बिस्किटे, औषधे, गृह उपयोगी भांडी आणि इतर आवश्यक साहित्य, स्वच्छ धुतलेले चांगले कपडे अशा स्वरूपातील सामुग्री वीर हनुमान मंदिरात संकलित करण्यात आलेली आहे. तसेच स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानने आर्थिक स्वरूपात दिलेल्या रुपये ५३०००/- ( रुपये त्रेपन्न हजार )च्या मदतनिधीतून सतरंजी, चादरी, ब्लॉंकेट इत्यादी साहित्य खरेदी करून त्यांतून एका कुटुंबासाठी आवश्यक असणाऱ्या किमान वस्तूंचा संच बनविण्यात येत आहे, असे दीडशे संच आणि इतर सर्व सामुग्री कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्त करण्यात येणार आहे.

या संकलनासाठी महेश मांडवकर, रामराजे बेंबडे, जयराम पवार, सिद्धराम मालगत्ती, पंडित मदने, हंबीरराव भिसे, शंकर मालगत्ती संतोष ठाकूर, दिलीप मांडवकर, वैजनाथ गुळवे, बापूराव साळोखे, रवींद्र लाडोकार, दत्ता पोतदार, मनोज काटमोडे, जयसिंग भोसले, सुनील खंडाळकर, दिलीप खंडाळकर, अशोक जमखिंडीकर, सुनील पंडित, मिलिंद वेल्हाळ यांनी पुढाकार घेतला. रावेत येथील संस्कार सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने  मराठा उद्योजक लॉबी, रोटरी क्लब ऑफ़ चिंचवड, अखिल मराठा विकास संघ, क्वीन्स टाउन हौ. सोसायटी, रायगड युवाशक्ती, एम ॲडव्हर्टायझिंग यांच्या सहकार्याने कोल्हापूर – सांगलीच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे दोन ट्रक पाठवून मदतीचा हात दिला.

या ट्रकमध्ये सुमारे एक लाखाचे औषधे, ७ हजार पाण्याच्या बाटल्या, २० बॉक्स सॅनिटरी नॅपकिन, वॉटर प्युरिफायर, दोनशे पोते नवीन कपडे, शंभर पोते जुने कपडे, दोन हजार बेडशिट, दोन हजार ब्लॅंकेटस, २० पोते तांदूळ, ३० पोते गहू, ५ पोते पीठ, मसाल्याचे पदार्थ, फिनेल, खराटे, मास्क, हातमोजे, स्वच्छतेचे साहित्य, भांडे, खाद्यपदार्थ पाठवले. सांगलीसाठी पाठवलेला साहित्याचा एक ट्रक ना. जयंत पाटील यांच्या स्वाधीन केला जाणार आहे. तर कोल्हापूरला पाठवलेला ट्रक सत्तारूढ पक्षनेते प्रवीण केसरकर यांच्याकडे स्वाधीन केला जाईल.

यावेळी संस्कार सोशल फाऊंडेशनचे व रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, कविता खंडागळे, क्वीन्स टाऊनचे शिरीष पोरेड्डी, विजय गोपाळे, बबन भोसले, मल्लीनाथ कलशेट्टी, सुरेश गारगोटे,  विवेक येवले, रविकिरण केसरकर, संदीप पाटील, रमेश सातव, रमेश भोसले आदी उपस्थित होते. यावेळी राहुल शिरोळकर, प्रशांत ताम्हणकर यांनी मोफत वाहतुकीची सोय केल्याबद्दल सन्मान केला. सुरेश गारगोटे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. पिंपळे सौदागर येथील रोझलॅण्ड सोसायटीकडूनही पूरग्रस्तांना तेल, चहा पावडर, तांदूळ, गव्हाचे पीठ, बिस्किट, साडी, बेडशीट, मीठ, डाल असे एकूण 19 हजार 980  रुपयांची मदत वस्तूंमध्ये देण्यात आली.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराने हाहाकार घातल्यानंतर तेथील नागरिकांसाठी ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ ने मदतीचा हात दिला आहे. जीवनावश्यक साहित्य आणि आर्थिक स्वरूपात मदत पूरग्रस्तांना पाठवण्यात आली आहे, अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पत्रकाद्वारे दिली.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातल्यामुळे शेकडो कुटुंबांना घराबाहेर पडावे लागले आहे. ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्तांसाठी आवश्यक तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर, दूध पावडर, बटाटे, कांदे, साबण, मीठ, बिस्किटे, हळद, मिर्ची, धनिया पावडर, सॅनिटरी पॅड्स या सह २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. दिनांक १० ऑगस्ट रोजी या साहित्याचा टेम्पो कोल्हापूरला रवाना करण्यात आला, असे ट्रस्ट’ चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

युवकांमध्ये सामाजिक जाणिव निर्माण होणे तसेच पूरग्रस्तांना मदत व्हावी या उद्देशाने ट्रस्टच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला. ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ ने  या आधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देखील मदतीचा हात म्हणून 51 हजार रुपयांची मदत तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) येथे अंध मुलींना आणि ‘ममता फाउंडेशन (कात्रज) येथे एड्सग्रस्त मुलांना झेंडे, फुगे, चॉकलेट आणि नाश्ता वाटप अशा स्वरूपाचे सामाजिक कार्य केले आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी येथील आम्ही भोसरीकर संस्थेच्या वतीने पुरग्रस्तांना मदत म्हणून दोनशे पाण्याचे बॉक्स, १०० पोती तांदूळ, ३५० जैकेट, ३०० ब्लँकेट, ५० पोती कपडे, ८ पोती मुरमुरे, १०० बाटली फिनाईल, ५० किलो फरसाण, थंडी तापाची औषधे, २०० चपला, १०० बिस्कीट, २७८ नव्या साडया, २८६ लहान मुलांची नविन ड्रेस, ड्रेस, २५ पोती जुनी चांगली कपडे रवाना करण्यात आली आहेत.

कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील पावसाने आलेल्या पुराची माहिती सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यम, वर्तमानपत्रांमधून पाहून या भयानक परिस्थितीत तेथील पूरग्रस्त नागरिकांना  माणुसकीच्या आधाराची गरज भोसरीतील आम्ही भोसरीकर या संस्थेच्या सदस्यांनी ओळखली आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी भोसरी परिसरात केले. तरुणांनी पुढाकार घेतलेल्या या कामास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि दिवसभरातच सर्व जीवनावश्यक वस्तू जमा करण्यात आल्या. आम्ही भोसरीकरच्या सर्व सदस्यांनी आणि भोसरीकरांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे कौतुक होत असून पूरग्रस्तांवर ओढवलेल्या संकट प्रसंगी मदत करण्याची भावना सर्वांमध्ये जागृत व्हावी व सर्वांनी पूरग्रस्त बांधवांना मदत करावी असे आवाहन आम्ही भोसरीकरच्या सदस्यांनी केले आहे.
तर भोसरीतील सक्षम सुनील लांडे या पाच वर्षाच्या मुलाने स्वतसाठी खाऊसाठी साठवलेले पीगीबॅंकमधील पैसे कोल्हापूर, सांगली, पूरग्रस्तांसाठी आमदार महेश लांडगे यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य कपडे याही स्वरुपात मदत केली.

अखिल भारतीय नाट्य परिषद व अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्यावतीनेही पूरग्रस्तांना मदत देण्यात येत आहे. या एक हात मदतीचा या उपक्रमांत ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी पाणी, औषध, कपडे, धान्य, चादरी, दूध भुकटी,कोरडया खाण्याची पाकीट आदी पुढील ठिकाणी स्विकारण्यात येतील असे आवाहन ही त्यांनी केले आहे. पत्ता – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा, कार्यालय, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे – ४११०३३. याठिकाणी वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत स्वीकारण्यात येतील, असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.