Pimpri: भाजपच्या माजी महापौरांची पक्षाच्या बैठकीला दांडी; माजी शहराध्यक्ष भडकले

बैठकीला केवळ 30 ते 35 नगरसेवकांची हजेरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या बैठकीकडे दोन माजी महापौर, आजी उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह अनेक नगरसेवकांनी दांडी मारली. त्यावरुन भडकलेले माजी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी ‘पदे घ्यायला पुढे येतात, अन् पक्षाच्या कामाला मागे असतात’ अशी खंत व्यक्त करत कुठेत माजी महापौर, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे बैठकीतील वातावरण काहीकाळ शांत झाले होते.

भाजपच्या नगरसेवकांची आज (शनिवारी) मोरवाडीतील पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. महासभेसमोरील प्रस्तावांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. मागील आठ ते दहा दिवसात भाजप नगरसेवकांची आजची पाचवी बैठक होती. महापालिकेत सत्ताधारी भाजपचे जनतेतून निवडून आलेले 77 आणि तीन स्वीकृत नगरसेवक आहेत.

तसेच पाच अपक्ष नगरसेवक देखील भाजपशी संलग्न असून भाजपच्या बैठकीला हजर असतात. त्यामुळे भाजप नगरसेवकांची एकूण संख्या 85 होते. दरम्यान, आजच्या बैठकीला अनेक नगरसेवकांनी दांडी मारली. केवळ 30 ते 35 नगरसेवक बैठकीला हजर होते.

भाजपचे पहिले महापौर नितीन काळजे, दुसरे महापौर राहुल जाधव, विद्यमान उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी आजच्या बैठकीला गैरहजर होते. नगरसेवकांच्या गैरहजेरीवरुन माजी शहराध्यक्ष चांगलेच भडकले. पदे घ्यायला पुढे येतात, पक्षाच्या कामाला मागे असतात. आजच्या बैठकीला माजी महापौर का नाहीत. कुठे आहेत माजी महापौर? असा सवाल आमदार जगताप यांनी केला. त्यामुळे बैठकीतील वातावरण काहीकाळ शांत झाले होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like