Pimpri: लाचखोर सेवानिलंबित कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत रुजू

एमपीसी न्यूज – लाच स्वीकारल्याप्रकरणी निलंबित केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 16 कर्मचा-यांना पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्यात आले आहे. त्यांना मूळ पदावर नियुक्ती देण्यात आली नाही. त्यांचा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहाराशी संपर्क येणार नाही, अशा अकार्यकारी पदांवर नियुक्‍ती केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निलंबन आढावा समितीच्या शिफारशीवरून ही कारवाई मागे घेण्यात आली.

महापालिका सेवेत कार्यरत असताना लाचलुचपत विभागाची कारवाई, शिस्तभंगातील दोषी अथवा फौजदारी गुन्ह्यातील सहभागामुळे अटक झालेल्या कर्मचा-यांना सेवानिलंबित करुन, त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाते. या चौकशीत दोषी आढळल्यास सक्‍त ताकीद, वेतनवाढीवर टाच अथवा सेवामुक्‍त करण्याची कारवाई करण्याची सेवा नियमात तरतूद आहे. महापालिका सेवेत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचा-यांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

  • महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या निलंबन समिती आढावा बैठकीत या सर्व कर्मचा-यांची केस स्टडी करण्यात आला. त्यानंतर लाचलुचपत आणि शिस्तभंगाची कारवाई झालेल्या अधिकारी व कर्मचा-यांना पुन्हा महापालिका सेवेत रुजू करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये एका बांधकाम व्यवसायिकाकडून बारा लाखांची लाच घेतलेले लघुलेखक राजेंद्र शिर्के, बिले काढण्यासाठी लाच घेतलेले लेखाधिकारी किशोर शिंगे, माध्यमिक विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी अलका कांबळे आणि मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांना यांना पुन्हा सेवेत घेतले आहे.

रुजू करुन घेतलेल्या सेवानिलंबित अधिकारी व कर्मचा-यांना त्यांच्या मूळ पदावर नियुक्‍ती देण्यात आलेली नाही. त्यांचा विभाग बदलण्यात आला आहे. त्यांचा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहाराशी संपर्क येणार नाही, अशा अकार्यकारी पदांवर नियुक्‍ती करण्यात आली. या काळात सेवा बजावताना बाहेरील नागरिकांशी जनसंपर्क होणार नाही, अशा पदांवर त्यांना काम करावे लागणार आहे.

  • ‘यांना’ घेतले पुन्हा सेवेत
    अलका कांबळे (मुख्याध्यापिका), बाबासाहेब राठोड (मुख्याध्यापक), राजेंद्र शिर्के (लघुलेखक), तानाजी दाते (सहाय्यक आरोग्य अधिकारी), किशोर शिंदे (लेखाधिकारी), प्रकाश रोहकले, (लिपिक), अमोल वाघेरे (लिपिक), उदय वानखेडे (सब ऑफीसर), अनिल माने (फायरमन), श्रावण कांबळे (क्रीडा शिक्षक), राजेश रजपुत (मजुर), सुभाष खरात (सर्व्हेअर), नीलेश राठोड (मजुर), शितल चतुर्वेदी (मीटर निरिक्षक) शैलेश जाधव (वॉर्डबॉय), सचिन घनवट (एम.पी.डबल्यू).

‘हे’ आहेत निलंबन आढावा समितीचे सदस्य!
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये अतिरिक्‍त आयुक्‍त (1) संतोष पाटील, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त मनोज लोणकर, मुख्यलेखा परिक्षक आमोद कुंभोजकर, एक मागासवर्गीय प्रतिनिधी (वर्ग एक अधिकारी) तसेच संबंधित निलंबित कर्मचा-याचा विभागप्रमुख अशी या समितीची रचना आहे. सहा महिन्यांतून एकदा या समितीची बैठक आयोजित करणे आवश्‍यक आहे. या समितीच्या बैठकीत सेवानिलंबित कर्मचा-यांना महापालिका सेवेत रुजू करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.