Pimpri: गणेश मूर्ती उंचीच्या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा – सतिश दरेकर

Ganesh Festival Update former corporator satish darekar demand ganesh Idol Height

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने गणेश मूर्तीच्या उंचीसंदर्भात घेतलेला निर्णय राज्यातील कुंभार समाजाला उध्वस्त करणार ठरणार आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक सतिश दरेकर यांनी केली आहे.

याबाबत दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेश मूर्तींची उंची चार फुट, तर घरगुती गणेश मुर्तींची उंची दोन फुट ठेवावी, असे आदेश काढले आहेत. या संदर्भातील आदेश गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) यांनी पारित केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी 11 जुलै 2020 रोजी हा आदेश परित केला आहे. त्यातील क्रमांक तीनच्या मुद्यामध्ये गणेश मूर्तींच्या उंचीबाबतचे आदेश दिले आहेत.

राज्य शासनाच्या या आदेशाला उशीर झाला आहे. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्याने कुंभार समाज उत्सावाच्या आधी आठ ते दहा महिने मूर्ती तयार करण्याचे काम करत असतात.

यासाठी मुर्तीकार मोठ्या प्रमाणात कर्जे घेत असतात. सद्य स्थितीत कोरोनामुळे कुंभार समाज आधीच मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या गणेश मूर्तींच्या या आदेशामुळे तयार केलेल्या मूर्ती विकल्या जाणार नाहीत व राज्यातील कुंभार समाज मोठ्या अर्थिक संकटात सापडून पूर्णतः उध्वस्त होईल.

यामुळे या मार्गदर्शक सुचना निर्णयातील क्रमांक तीनच्या मुद्याचा शासनाने फेरविचार करावा. त्याची अंमलबजावणी या वर्षी करु नये, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

या संदर्भात सतिश दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना पत्र पाठवून निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी विनंती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.