Pimpri : ‘आरोग्य मित्र’च्या प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, लोकमान्य हॉस्पिटल्स, भावसार व्हिजन, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन, रोशनी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य मित्र’ या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक, रुग्णालय आणि डॉक्टर यांच्यामधील समन्वयक म्हणून हा ‘आरोग्य मित्र’ काम करणार आहे. आरोग्य मित्रच्या प्रक्षिक्षण कार्यक्रमाची सुरुवात आज (रविवार)पासून झाली.

निगडी प्राधिकरणमधील सिटी प्राईड स्कूल येथे प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन झाले. हे प्रशिक्षण शिबीर तीस तासांचे आहे. प्रत्येक आठवड्याला दोन तास प्रात्यक्षिक आणि दोन तास मार्गदर्शन असे एकूण चार तास प्रक्षिक्षण होणार आहे. लोकमान्य हॉस्पिटल येथे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे. संपूर्ण प्रशिक्षणात 15 मोड्यूल्स असणार आहेत.

  • आरोग्य मित्र हा कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणून तयार केला जाणार आहे. पहिल्या बॅचमध्ये वीस प्रशिक्षणार्थी आहेत. सर्व प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी व संकल्पना यांचा मुख्य उद्देश समाजसेवा हाच आहे. प्रशिक्षणासाठी कोणतीही फी घेण्यात आली नाही. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.यामुळे समाजात सेवाभाव वृद्धी वाढीस लागणार आहे.

लोकमान्य हॉस्पिटल्सचे डॉ. जयंत श्रीखंडे यांनी ‘प्रथमोपचार’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. दिलीप कानडे यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

  • आरोग्य मित्र
    रस्ते अपघात झाल्यास, सार्वजनिक ठिकाणी एखादी घटना घडल्यास संबंधित रुग्णाला रुग्णालयात पोहचायला विलंब होतो. प्रसंगी तातडीने उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. हे प्रकार कमी करण्यासाठी तसेच रुग्ण, रुग्णालय अन्‌ डॉक्टरांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे.

रुग्णाला रुग्णालयात वेळेत पोहचविण्याचे समाजकार्य आरोग्य मित्र पार पाडणार आहेत. त्याचबरोबर केंद्र, राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांची जनजागृती करणार आहेत. उपचारासाठी कोठून आणि कशी मदत मिळवायची याबाबत देखील रुग्णांना माहिती दिली जाणार आहे. आरोग्य मित्रांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर योग्यता तपासण्यात येईल. मगच आरोग्य मित्राचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2