Pimpri:  केरळमधील पूरग्रस्त शाळेला ‘अल्फा लावल’ बनविणार आदर्श शाळा

विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचीही योजना

एमपीसी न्यूज – केरळमधील पूरग्रस्त शाळांच्या पुनर्उभारणीसाठी अल्फा लावल इंडियाच्या सहकार्याने सेटा (कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग त्रिवेंद्रम अल्युमनाय) व गॅलेक्सी चॅरिटेबल ट्रस्ट/ होप (हेल्पिंग आउटस्टॅंडिंग प्युपील्स इन एज्युकेशन) यांनी सुरु केलेल्या ‘प्रोजेक्ट समग्र’ या प्रकल्पाचे केरळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जी. सुधाकरन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 

केरळमधील अलापुझा येथील मनकोंबु व्यावसायिक सरकारी उच्च माध्यमिक शाळेचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. सरकारी शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मनकोंबु व्यावसायिक शाळा केरळमधील पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शाळांपैकी एक आहे.  

  • अल्फा लावल कंपनीच्या सामाजिक बांधीलकी कार्यक्रमांतर्गत (सीएसआर) शिक्षणक्षेत्रासाठी करावयाच्या कार्यांमध्ये या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या शाळेच्या पुनर्उभारणीचे काम त्यासंबंधीच्या बृहत आराखड्यातील तीन टप्प्यांमध्ये केले जाणार आहे. शाळेच्या बांधकामांमध्ये स्थानिक सामुग्राचा अधिक वापर करणे, शक्य तितक्या प्रमाणात बांधकाम पर्यावरण पुरक ठेवणे, आणि इमारत देखभालीसाठी सोयीची व कमी खर्चिक ठेवणे या बाबींकडे या आराखड्यात विशेष लक्ष देण्यात आले आहे. पालक शिक्षक संघ, अलापुझाचे जिल्हा प्रशासन, अल्फा लावल आणि सेटा गॅलेक्सी या सगळ्यांकडून आलेल्या सुचनांच्या आधारे पुनर्उभारणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे-

1.   चार नव्या वर्ग खोल्यांची उभारणी

2.   पुरामुळे नुकसान झालेले फर्निचर, प्रयोगशाळांमधील साहित्य, रंगकाम, फरशा बदलणे

3.   शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लांट

4.   नवी आणि सुबक अशी शौचालय व सांडपाणी व्यवस्था

5.   शोषखड्डे बांधणे

6.   सबलीकरण कार्यक्रम (विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण) 

  • यावेळी बोलताना अल्फा लावलचे क्लस्टर प्रेसिडेंट आणि व्यवस्थापकीय संचालक अनंथ पद्मनाभन म्हणाले की, समाजासाठी काही सकारात्मक आणि भरीव काम करण्याच्या हेतूने काही विशिष्ट क्षेत्रात लोकांच्या दैनंदिन जगण्याच्या परिस्थितीत चांगले बदल घडवून आणणे हे आमच्या सामाजिक बांधीलकी उपक्रमाचे (सीएसआर) ब्रीद आहे. शिक्षण हे त्यातीलच एक क्षेत्र आहे. केरळमधील पुराचा तडाखा बसलेल्या या शाळेची पुनर्उभारणी करण्याचा आमचा हा प्रकल्प एक पथदर्शी प्रकल्प बनेल असा आम्हाला विश्वास वाटतो.   

सीएसआर उपक्रमांतर्गत अल्फा लावलने अनेक शाळांची उभारणी केली आहे तसेच ग्रामीण भागातील शाळांना बस, वाचनालय आणि आधुनिक सुविधा पुरविण्याचेही काम केले आहे. कंपनीतर्फे देशाच्या विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी अनेक सामुदायिक शिक्षण केंद्राचेही व्यवस्थापन केले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.