Pimpri : असा घडला हितेश मुलचंदानीच्या अपहरण आणि खुनाचा थरार

एमपीसी न्यूज – एका हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी एका तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा गळा कापून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागच्या बाजूला रस्त्यावर टाकून दिला. ही घटना मंगळवारी (दि. 23) पहाटे घडली. या तरुणाच्या अपहरण आणि खुनाचा थरार असा घडला –

लिंगा, लंगडा, अमीन, शाहबाज आणि अरबाज हे पाचजण मंगळवारी (दि. 23) रात्री पुण्यातील प्यासा लॉजवर गेले. लॉजवर ते सर्वजण भरपूर दारू प्यायले. दारू पिल्यानंतर लिंगा आणि लंगडा या दोघांना घरी सोडण्यासाठी ते सांगवी येथे आले. तोपर्यंत त्यांच्या दारूची नशा उतरू लागली होती. मध्यरात्र झाली असल्याने ते हॉटेल शोधत पिंपरीमधील कुणाल बार अँड रेस्टोरंट या हॉटेलमध्ये बिअर घेण्यासाठी आले.

  • हॉटेलमधून बिअर घेत असताना अमीन खान हॉटेलच्या गेटवर लघुशंका करू लागला. साहिल ललवाणी यांनी त्याला लघुशंका करण्यापासून रोखले. या रागातून अमीन आणि त्याच्या साथीदारांनी मिळून साहिल ललवाणी यांना शिवीगाळ केली. तसेच अमीन खान याने हॉटेलमधील वेटर कैलास पाटील याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. वेटर कैलास पाटील यामध्ये गंभीर जखमी झाला. यानंतर पाचही जणांनी पळापळ सुरु केली. हॉटेलमधील कामगारांनी एकत्र येत आरोपींवर हल्ला चढवल्याने अरबाज, लिंगा आणि लंगडा या तिघांनी मोटारीतून पळ काढला. अमीनला कामगारांनी पकडून ठेवले तर शहाबाज हा राधिका चौकाकडे पळत सुटला.

त्यावेळी फिर्यादी रोहीत किशोर सुखेजा (वय 26 रा. पिंपरी) यांचा चुलत भाऊ लखन सुखेजा आणि हितेश मुलचंदानी हे दोघेजण हॉटेलसमोरून येत होते. दोघांनी अमीन खान याला पकडून ठेवले. लखन हॉटेलमध्ये मदत मागण्यासाठी गेला असता हितेशने अमीन खानला पकडून ठेवले. त्यावेळी पळून गेलेले आरोपी पुन्हा मोटारीतून आले. त्यांनी हितेशला जबरदस्तीने मोटारीत घालून पळवून नेले. दरम्यान, अमीन खानला हॉटेलमधील कामगारांनी पकडून ठेवले.

  • हितेशला पळवून नेल्यानंतर काही वेळाने आरोपींनी अमीनच्या मोबाईलवर फोन केला. फोन वेटरला देण्यास सांगितले. ‘आमच्या माणसाला सोडून द्या, अन्यथा तुमच्या माणसाला ठार मारू’ अशी धमकी आरोपींनी वेटरला फोनवरून दिली. मोटारीत बसल्यानंतर शहाबाज याने बकर्‍याची कातडी सोलण्यासाठी वापरण्यात येणार्‍या छोट्या चाकूने हितेशच्या गळ्यावर वार केले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्याने आरोपींनी हितेशला मोटारीतील मागच्या सीटच्या मोकळ्या जागेत ढकलून दिले. तेथेच हितेशने तडफडून जीव सोडला. दरम्यान, अमीनच्या मोबाइलवरून हितेशच्या मित्रांचे फोन येत होते. ‘हितेशला सोडा, आम्ही अमीनला सोडतो’ अशी विनंती ते करीत होते.

हितेशने जीव सोडल्यामुळे आरोपींनी खोटा बनाव केला. हितेशला काळेवाडी येथील पाचपीर चौकात सोडल्याचे सांगून त्यांनी अमीनला सोडा, असे सांगितले. मात्र, हितेशच्या मित्रांना आरोपींवर विश्वास नसल्याने त्यांनी पाचपीर चौक येथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी आरोपींनी हितेशच्या मित्रांना पुन्हा पिंपळे सौदागर येथील स्वराज गार्डनसमोर हितेशला सोडल्याचे खोटे सांगितले. हितेशच्या मित्रांनी तेथे जाऊन देखील हितेशचा शोध घेतला. खोटे बोलून अमीनची सुटका करण्याचा प्लॅन फसल्याने आरोपींनी शेवटी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागे रस्त्यावर हितेशचा मृतदेह टाकून दिला व मोबाईल बंद केले. दोन तासांच्या नाट्यानंतर हॉटेलमालक आणि हितेशच्या मित्रांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.

  • पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागच्या बाजूला रस्त्यावर हितेशचा मृतदेह सापडला. याप्रकरणी रोहीत किशोर सुखेजा (वय 26 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा, योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (दोघे रा. सांगवी), आमिन फिरोज खान (रा. मोमिनपुरा, गंजपेठ, पुणे), शहाबाज शिराज कुरेशी (रा. कासरवाडी) आणि अरबाज शेख (रा. खडकी) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

हॉटेलचालकांनी अमीन फिरोज खान याला त्याच दिवशी पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने लिंगा आणि लंगडा या दोघांना औंध रोडवरील महाराष्ट्र रेस्टोरंट जवळून अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अरबाज शेख याला दापोडी मधून अटक केली. शहाबाज हा आरोपी सध्या फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. अटक केलेल्या आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.

  • या खून प्रकरणातील फरार आरोपी शहाबाज कुरेशी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खडकी आणि भोसरी पोलिस ठाण्यात एकूण 16 गुन्ह्यांची नोंद आहे. शहाबाजचे वडील देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मोक्‍का अंतर्गत कारवाई झाली आहे. बकर्‍या चोरून त्यांची विक्री करणारे बापलेक म्हणून ते ओळखले जातात. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटार पिंपळे निलख येथून चोरल्याची कबुली दिली आहे. 17 जुलै रोजी मोटार चोरीबाबत सांगवी पोलिस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.