Pimpri: शहर विकासाबाबत सत्ताधाऱ्यांची उदासिनता; विषय नसल्याने जूनची सर्वसाधारण सभा होणार नाही

The indifference of the authorities towards city development; Since There will be no general meeting in June

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या राजवटीला साडेतीनवर्ष पूर्ण झाले. तरीही, भाजपचा कारभार अतिशय संथगतीने सुरु आहे. अंतर्गत राजकारणात पक्ष गुरफटल्याने त्यांना सत्ताधारी म्हणून महासभेसमोर शहर विकासाचे विषय देखील आणणे शक्य होत नाही. विषयपत्रासाठी विषय नसल्याने जून महिन्याची सर्वसाधारण सभा न घेण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढाविली आहे. यातून शहर विकासाबाबतची सत्ताधा-यांची उदासिनता दिसून येत आहे.

शहराचा चेहरा- मोहरा बदलण्याचे आश्वासन दिल्याने शहरवासियांनी भाजपला ‘थंपिंग मेजॉरीटी’सह महापालिकेत एकहाती सत्ता दिली. महापालिकेत भाजपचे 77 नगरसेवक आहेत.

14 मार्च 2017 रोजी पहिली सभा होवून नवीन सभागृह अस्तित्वात आले. मात्र, सभेच्या कामकाजाबाबत आणि शहर विकासाबाबत भाजप नगरसेवकांमध्ये उदासिनता असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेतील सत्तेला साडेतीन वर्ष पूर्ण झाले. तरीही , भाजपचे कामकाज संथगतीने सुरु आहे. महापालिकेतील सर्वसाधारण सभा ही अंतिम सभा असते. शहर विकासाचा कोणताही निर्णय या सभेतच होतो. त्यामुळे ही सभा होणे अतिशय महत्वाचे असते.

दरमहिन्याला एक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात 20 तारखेपूर्वी सभा घेतली जाते. सभेचे विषयपत्र दहा दिवस अगोदर तयार केले जाते. त्यानंतर महापालिकेच्या संकेतस्थळावर देखील विषयपत्र टाकले जाते.

तथापि, जून महिन्यातील 16 तारीख उलटली. तरी, विषयपत्रच तयार झाले नाही. विषयच नाहीत. मग, काय सत्ताधारी भाजप आणि प्रशाससाने जून महिन्याची सभाच न घेण्याचे निश्चित केले आहे.

सत्ताधारी म्हणून भाजपने प्रशासनाकडे पाठपूरावा करुन शहर विकासाचे विविध प्रस्ताव आणणे आवश्यक असते.

परंतु, नियमित पक्षबैठक, धोरणात्मक निर्णयावर एकमताचा अभाव, गटबाजी, अडवा-जिरवा भुमिकांमुळे महासभा घेण्यासाठी विषय देखील आणणे भाजपला मुश्किल झाले आहे.

आजपर्यंत पहिल्यांदाच विषय नसल्यामुळे सर्वसाधरण सभा होत नाही. ही भाजपची नामुष्की असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील 103 डॉक्टरांना कायम करण्याचा प्रस्ताव विधी समितीने काही दिवस तहकूब ठेवला.

अखेरच्या 12 जूनच्या सभेत त्या विषयाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे तो विषय देखील महासभेसमोर येवू शकला नाही.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, जून महिन्यात विशेष सभा झाली आहे. जून महिन्याच्या नियमित सभेचे विषयपत्र नाही. डॉक्टरांच्या विषयासाठी सभा घेतली जाणार आहे. आयत्यावेळी विषय दाखल करुन घेतला जाईल.

सभागृह नेते नामदेव ढाके यांनी त्याच्याअगदी विरुद्ध प्रतिक्रिया दिली. ढाके म्हणाले, 1 जूनलाच या महिन्याची सर्वसाधरण झाली आहे. विशेष सभा घेतली आहे.

त्यामुळे नियमित सभा होणार नाही. यावरून महापौर आणि सभागृह नेत्यांच्या प्रतिक्रियेत भिन्नता दिसून आली. समन्वय नाही. विशेष सभेलाच सत्ताधारी सर्वसाधारण सभा समजत आहेत.

याबाबत नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ”जून महिन्याची सर्वसाधारण सभा घेतली जाणार नाही. सभेसाठी विषयच नाहीत. त्यामुळे सभा होणार नाही. डॉक्टरांचा कायम करण्याचा प्रस्ताव विषयपत्र तयार करण्याचा कालावधी संपल्यानंतर आला.

महिन्यातून एक सभा घेणे आवश्यक आहे. मागील तहकूब सभा जून महिन्यात झाल्या आहेत. त्यामुळे नियमप्रमाणे काही अडचण नाही. कोरोनामुळे राज्य सरकारने महासभा घेण्याचे अधिकार महापालिकेला दिले आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.