Pimpri : उद्योग झाले गतिमान; कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे उद्योजक हैराण

The industry is booming; Entrepreneurs harass due to shortage of skilled workers

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील उद्योग सुरू होऊन महिना होत आला तरी कंपनीत कामासाठी कुशल कामगार मिळत नसल्यामुळे उद्योजक हैराण झाले आहेत.

लाॅकडाऊनच्या काळात जवळपास सर्वच उद्योगांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करत उद्योग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सर्व उद्योजकांनी घेतला. औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा दोन महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांती नंतर उद्योग पुन्हा गतिमान झाले.

मात्र, कोरोना संसर्गाच्या भितीने आपल्या मूळ गावी परतलेले कुशल कामगार उद्योग सुरू झाल्यावर परत आलेले नाहीत. त्यामुळे कुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा उद्योजकांना भासत आहे.

कंपनीत कुशल कामगार नसल्यामुळे हाती घेतलेले काम पूर्ण करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच नवीन काम हाती घेण्यास उद्योजक धजावत नाहीत. उद्योजकांना हातातील काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे पार्टीकडून वेळेत पैसे भेटत नाहीत त्यामुळे उद्योजक दोन्ही बाजूने कोंडीत सापडला आहे.

चौथ्या लाॅकडाऊनमध्ये ठिक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगारांना मूळ गावी परतण्यासाठी मुभा देण्यात आली. त्यामुळे शहरात अडकून पडलेले परराज्यातील कामगार व महाराष्ट्रातील कामगार आपल्या मूळ गावी परतले.

दरम्यान, कोरोनाच्या भितीने तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून हे कामगार उद्योग सुरू झाले तरी पुन्हा कामावर परतण्यासाठी तयार नाहीत. तसेच जे काही थोडेफार कामगार परत येत आहेत त्यांना 14 दिवस सक्तीचे होम क्वारंटाइन असल्यामुळे लगेच कामावर हजर राहता येत नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे.

पिंपरी चिंचवड लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष दीपक फल्ले यांना कामगार कमतरतेबद्दल म्हणाले की, कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर कुशल व अकुशल कामगार गावाकडे स्थलांतरित झाले आहेत.

त्यामुळे कंपनीतील अद्ययावत मशीन चालवण्यासाठी प्रशिक्षित कामगार उपलब्ध नाहीत, फक्त अकुशल कामगारांच्या उपस्थितीत काम पूर्ण करता येत नाही. तसेच हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे आर्थिक अडचणीसह इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे.

फल्ले पुढे म्हणाले, कामगारांना शहरात येण्यासाठी अनिवार्य असणारा ई-पास काढण्यासाठीचे नियम सरकारने शिथिल करावेत तसेच शहरात आल्यानंतर 14 दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी कमी करण्यात यावा. मात्र, संबंधित कामगारांची सतत वैद्यकीय तपासणी जरूर करावी आणि ज्यांना लक्षणे असतील त्यांची चाचणी करून योग्य उपचार करावेत.

तसेच ज्या पद्धतीने कामगारांना मूळ गावी परतण्यासाठी मुभा देण्यात आली तशीच मुभा परत कामावर हजर राहण्यासाठी द्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.

उद्योग सुरू होऊन महिना होत आला तरीही कामगार मिळत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत कामगार मिळणे फार गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील कुशल कामगारांना रोजगार मिळवण्यासाठी हि मोठी संधी उपलब्ध असल्याचे फल्ले म्हणाले. मराठी तरुणांनी यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.