BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : दुकानदाराच्या प्रसंगावधानामुळे भटकलेली मुलगी दोन तासात घरी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – जवळ पैसे असल्याने पिंपरी परिसरातून भटकत-भटकत 11 वर्षीय मुलगी शाळा सुटल्यानंतर लोणावळ्याला गेली. तिथे एका चिक्कीच्या दुकानात खरेदी करताना ती भटकल्याचा संशय दुकानदाराला आला आणि त्याने तिच्याकडे चौकशी करत तिच्या पालकांना व पोलिसांना माहिती दिली. दुकानदाराने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे भरकटलेली मुलगी दोन तासात घरी सुखरूप पोहोचली. ही घटना गुरुवारी घडली.

रुध्वी महेश लाड (वय-11 रा. काळभोर नगर) असे भटकलेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुध्वी नेहमी प्रमाणे शाळेत गेली. शाळेनंतर ती तीच्या ट्यूशन क्‍लासेसला देखील गेली. तेथून तिच्या नेहमीच्या रिक्षावाल्या काकांनी तिच्या घरा समोर तिला सातच्या सुमारास सोडले. मात्र रात्री आठ वाजले तरी ती घरी आली नाही. पालकांनी तात्काळ परिसरातील नगरसेविका वैशाली काळभोर यांना माहिती दिली. काळभोर यांनी पिंपरी पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान घरच्यांना लोणावळा येथून एक फोन आला. त्यांची मुलगी लोणावळा येथे एका चिक्कीच्या दुकानात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी त्यांची तपास पथके लोणावळ्याच्या दिशेने रवाना केली. रात्री सात वाजता हरवलेली मुलगी रात्री दहा वाजता घरी सुखरूप परतली.

हरवलेल्या रुध्वीकडे याबाबत चौकशी केली असता तिने सांगितले की, तिच्या आई-वडीलांनी ट्यूशनची फी भरण्यासाठी पैसे दिले होते. ते पैसे तिने ट्युशनला भरले नाहीत. ती संध्याकाळी सात वाजता रिक्षातून घराजवळ उतरली. पण ती घरी न जाता चिंचवड रेल्वे स्थानकावर गेली. तेथून ती लोकलने लोणावळा येथे गेली. तिथे तिने चिक्कीच्या दुकानात जाऊन खरेदी केली. यावेळी तिच्या जवळ असलेले पैसे, शाळेचा गणवेश पाहून दुकानदाराला शंका आली. त्याने तिला प्रेमाने विचारले. तिने संपूर्ण माहिती दुकानदाराला सांगितली. तिच्या जवळचे काही फोन क्रमांकही दुकानदाराला दिले. त्यानुसार त्या सदगृहस्ताने संबंधीत क्रमांवर फोन लावून संपूर्ण प्रकार सांगितला व रुध्वी सुखरूप असल्याचे ऐकून पालक व पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. ही कारवाई पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख व त्यांचे तपास पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A4

.