Pimpri: महापौर, आयुक्त यांनी केली पालखी मार्गाची पाहणी

एमपीसी न्यूज – आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त देहू कमान विठ्ठलवाडी मार्ग, तसेच देहू कमान ते झेंडेमळा दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत नव्याने डांबरीकरण करत असलेल्या रस्त्याची महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शुक्रवारी)पाहणी केली. पालखी मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे, प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना महापौर जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.

जग्‌दगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 24 जून रोजी होणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरातून जाते. पालखीचे प्रस्थान दोन दिवसांवर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना देण्यात आले.

  • यावेळी सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, उपअभियंता संजय काशीद, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळोखे, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास गाडे, नवनाथ टिळेकर, संभाजी घारे उपस्थित होते.

विठ्ठलवाडी येथे सरकारमार्फत सुरु असलेले काम संथ गतीने सुरु आहे. हे काम तातडीने पुर्ण करण्याबाबत महापालिकेच्या वतीने संबंधीत विभागांना पत्र दिले आहे.

  • जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळा बैठकीमध्ये काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या होत्या. परंतु, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यावर नाराजी व्यक्त करत महापौर जाधव यांनी ठेकेदाराला दोन दिवसात काम पुर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर पालखी मार्ग तातडीने पूर्ण झाल्यास महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करावी, असेही महापौर जाधव, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.